लोकशाहीच्या प्रगल्भ प्रवासात निवडणुका हा केवळ सत्तेचा सोपान नसून तो जनतेने दिलेल्या विश्वासाचा जाहीरनामा असतो. निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांकडून घोषणांचे आणि टॅगलाईन्सचे पेव फुटते. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ‘करून दाखवलं’ या घोषवाक्याचा आक्रमकपणे प्रचार केला जात आहे. मात्र, जाहिरातींच्या झगमगाटात लपलेलं सत्य जेव्हा आपण अभ्यासू नजरेने शोधू लागतो, तेव्हा अडीच वर्षांच्या त्या कार्यकाळाचा जो पट समोर येतो, तो महाराष्ट्राच्या प्रगतीला पोषक नसून विघातक ठरलेला दिसतो. राजकीय विश्लेषक आणि सजग नागरिक म्हणून जेव्हा आपण या दाव्यांची पडताळणी करतो, तेव्हा प्रश्न पडतो की, नक्की काय करून दाखवले? महाराष्ट्राला विकासाच्या महामार्गावर नेले की अहंकाराच्या अंधारात अडीच वर्ष मागे ढकलले? या प्रश्नाचे उत्तर शोधणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय अध:पतनाचा पंचनामा करणे होय.
कोणत्याही राज्याचा विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांच्या वेगावर आणि धोरणात्मक सातत्यावर अवलंबून असतो. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्राला एक आधुनिक व्हिजन दिले होते. समृद्धी महामार्ग, मेट्रो-३, जलयुक्त शिवार, कोस्टल रोड आणि मराठवाडा वॉटर ग्रिड यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनी महाराष्ट्राच्या विकासाची नवी परिभाषा लिहिली होती. मात्र, २०१९ मध्ये सत्तेची समीकरणे बदलली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारने सत्तेवर येताच जे पहिले ‘कर्तृत्व’ गाजवले, ते म्हणजे फडणवीस सरकारच्या काळात सुरू असलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांना दिलेली ‘स्थगिती’. आरे मेट्रो कारशेडचे प्रकरण हे केवळ एक उदाहरण नसून तो राजकीय सूडबुद्धीचा कळस होता. केवळ एका व्यक्तीच्या अहंकारापोटी मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचा खर्च १०,००० कोटी रुपयांनी वाढला आणि प्रकल्प अडीच वर्षे लांबणीवर पडला. याला ‘करून दाखवणे’ म्हणता येईल का? की हे राज्याच्या प्रगतीला ‘थांबवून दाखवणे’ आहे, याचे उत्तर जनतेला ठाऊक आहे.
प्रशासकीय अलिप्तता हा या कार्यकाळातील सर्वात मोठा चिंतेचा विषय होता. महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. अशा राज्याचा प्रमुख जेव्हा अठरा-अठरा महिने मंत्रालयाची पायरी चढत नाही, तेव्हा प्रशासकीय यंत्रणेत मरगळ येणे स्वाभाविक आहे. मंत्रालयात फाईलींचा डोंगर साचलेला असताना, धोरणात्मक निर्णयांची फाईल स्वाक्षरीविना पडून असताना मुख्यमंत्री मात्र ‘मातोश्री’वरून किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधण्यात धन्यता मानत होते. लोकशाहीत नेतृत्व हे जनतेत जाऊन, रणांगणावर उतरून काम करण्याचे असते. संकटाच्या काळात फेसबुक लाईव्ह करून ‘मी तुमचा कुटुंबप्रमुख’ म्हणणे भावनिकदृष्ट्या चांगले वाटू शकते, पण प्रत्यक्ष प्रशासनात मात्र मुख्यमंत्री म्हणून ते अपयशी ठरले. या संवादशून्यतेमुळे केवळ प्रशासनच ठप्प झाले नाही, तर स्वतःचा पक्षही विखुरला गेला. आमदारांना भेटण्यासाठी वेळ न देणे, त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे आणि केवळ एका विशिष्ट कोंडाळ्यात राहून राज्य चालवणे, यामुळेच शिवसेनेच्या ऐतिहासिक फुटीची बीजे रोवली गेली. स्वतःचा पक्ष आणि स्वतःचे आमदार टिकवता न येणे, याला ‘करून दाखवलं’ म्हणणे हा एक प्रकारचा उपरोधिक विनोदच आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तर या कार्यकाळाने सर्वात मोठी वैचारिक कोलांटउडी मारली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रखर हिंदुत्वाचा विचार आयुष्यभर जपला, ज्या विचारासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, त्या विचारांना सत्तेच्या खुर्चीसाठी तिलांजली देण्यात आली. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्याच विचारसरणीशी जुळवून घेण्याचा जो केविलवाणा प्रयत्न झाला, तिथेच शिवसेनेच्या नैतिक अध:पतनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे आणि पालघरमधील साधूंच्या हत्येसारख्या संवेदनशील घटनेवर सोयीस्कर मौन बाळगणे, हे ‘बाळासाहेबांचे हिंदुत्व’ नक्कीच नव्हते. ज्या विचारधारेवर पक्षाची आणि कार्यकर्त्यांची उभारणी झाली, तिलाच सत्तेसाठी गहाण ठेवून ‘सत्ता टिकवून दाखवणे’ याला कर्तृत्व म्हणता येत नाही, तर ती एक वैचारिक शरणागती होती. ‘धगधगती मशाल’ ही सोयीच्या राजकारणामुळे ‘कोमट’ होत गेली आणि सामान्य शिवसैनिकाचा विश्वास उडाला.
मुंबई महापालिका हा तर भ्रष्टाचाराचा एक स्वतंत्र अध्याय बनला. गेल्या अडीच दशकांपासून मुंबईवर सत्ता असतानाही मुंबईकरांना दर पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्याचा आणि जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. कोव्हिडच्या जागतिक संकटात जेव्हा जग मृत्युच्या छायेत होते, तेव्हा मुंबईत पारदर्शकता अपेक्षित होती. मात्र, त्याच काळात ‘खिचडी’ घोटाळा, ‘बॉडी बॅग’ घोटाळा आणि कोव्हिड सेंटरमधील गैरव्यवहार समोर आले. कोव्हिड काळात लोकांच्या टाळूवरचं लोणी कसं खायचं, हे यांनी खऱ्या अर्थाने ‘करून दाखवलं’. स्वतःला जागतिक पातळीवरचा ‘बेस्ट सीएम’ घोषित करण्यासाठी जनसंपर्क यंत्रणेवर आणि जाहिरातींवर जो अफाट खर्च केला गेला, तो पैसा जर मुंबईच्या आरोग्यावर किंवा रस्त्यांच्या कामावर खर्च झाला असता, तर आज परिस्थिती वेगळी असती. पीआर एजन्सीच्या माध्यमातून इमेज सुधारता येते, पण प्रत्यक्ष ग्राऊंडवरचे काम आणि चारित्र्य सुधारता येत नाही, हे या काळात स्पष्ट झाले.
आदित्य ठाकरे यांच्या रूपात एक ‘थोपवलेले’ नेतृत्व राज्यावर लादण्याचा जो प्रयत्न झाला, त्याने शिवसेनेच्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केले. ज्यांना शेतातली माती, खेड्यातले प्रश्न आणि प्रशासनातील बारकावे ठाऊक नाहीत, अशा ‘इन्स्टाग्राम’ लीडरशिपच्या हाती राज्याचे भविष्य सोपवणे हा एक जुगार होता. अडीच वर्षांच्या कार्यकाळात या युवा नेतृत्वाने केवळ ‘टूरिझम’ आणि ‘ट्विटर’ पलीकडे काय ठोस कामगिरी केली, याचे उत्तर कोणाकडेही नाही. पोरकट राजकारण आणि प्रशासनावरील पकड नसणे यामुळेच अनुभवी नेते आणि आमदार बाजूला होत गेले. स्वतः फसवणूक करून सत्तेत बसले आणि जेव्हा आमदार सोडून गेले तेव्हा त्यांना ‘गद्दार’ म्हणणे हा दुटप्पीपणा आहे. “मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू” यांसारखी विधाने करून पदाची गरिमा कशी घालवायची, हेच केवळ या काळात ‘करून दाखवलं’ गेलं.
दुसरीकडे, आज जेव्हा आपण महायुती सरकारच्या कामगिरीकडे पाहतो, तेव्हा ‘करून दाखवणे’ म्हणजे काय असते, याचे दर्शन घडते. देवेंद्र फडणवीस यांनी जपान, जर्मनी आणि इस्रायलसारख्या बलाढ्य देशांशी केलेले करार हे महाराष्ट्राच्या तरुणांसाठी लाखांच्या नोकऱ्यांचे दरवाजे उघडणारे आहेत. ‘अटल सेतू’सारखा आधुनिक भारताचा चमत्कार, कोस्टल रोडचे लोकार्पण, आणि ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना दिलेला आर्थिक आधार, हे सर्व प्रकल्प केवळ कागदावर नसून ते प्रत्यक्षात उतरले आहेत. फडणवीस यांचे व्हिजन हे केवळ भाषणांपुरते मर्यादित नसून ते अंमलबजावणीवर आधारित आहे. फडणवीसांनी आणि महायुतीने ‘करून दाखवलं’ आहे, आणि उद्धव ठाकरेंनी फक्त ‘बोलून दाखवलं’ आहे.
शेवटी, राजकारणात घोषणा आणि जाहिराती काही काळासाठी लोकांची दिशाभूल करू शकतात, पण इतिहासाच्या पानात जागा मिळवण्यासाठी ठोस कर्माची पावती लागते. उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीचा प्रवास हा ‘सत्तेसाठी तत्त्व सोडणे’, ‘अहंकारासाठी विकास रोखणे’ आणि ‘फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आभासी जग निर्माण करणे’ असा राहिला आहे. अडीच वर्षांचा हा काळ महाराष्ट्रासाठी एक ‘पॉज बटन’ ठरला होता. त्यामुळे “करून दाखवलं” ही टॅगलाईन म्हणजे स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा सुज्ञ नागरिक आता जागा झाला आहे. त्याला आता ‘टोमणे’ मारणारे आणि ‘स्थगिती’ देणारे नेतृत्व नको आहे, तर महाराष्ट्राला ‘ग्लोबल’ स्तरावर नेणारा ‘विकास पुरुष’ हवा आहे. खऱ्या अर्थाने सांगायचे तर, उद्धवजींनी एकच गोष्ट ‘करून दाखवली’ – ती म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा पक्ष, स्वतःचा सन्मान आणि स्वतःच्या पित्याचा ऐतिहासिक वारसा उध्वस्त करण्याची आत्मघातकी किमया! शिवसेनेचे तुकडे यांनी केले, महाराष्ट्राला अडीच वर्ष मागे यांनी नेले आणि जनतेला तोंडघशी यांनी पाडले. खरोखरच… “उद्धवजी, तुम्ही करून दाखवलं!”