मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी यादीवरून भाजप आणि शिवसेना (UBT) यांच्यात जुंपली आहे. “शिवसेना कधीच उमेदवारी यादी जाहीर करत नाही,” या संजय राऊत यांच्या दाव्याचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाचार घेतला आहे. राऊतांचा हा दावा म्हणजे ‘राजकीय अध:पतन’ असल्याची घणाघाती टीका उपाध्ये यांनी केली आहे.
‘सामना’चा इतिहास नाकारला?
संजय राऊत यांनी नुकतेच विधान केले होते की, शिवसेना कधीच अधिकृत यादी प्रसिद्ध करत नाही, तर थेट ‘एबी फॉर्म’ देते. यावर आक्षेप घेत केशव उपाध्ये यांनी फेसबुक आणि एक्स (ट्विटर) वर पोस्ट लिहीत राऊतांना आरसा दाखवला आहे. उपाध्ये म्हणतात:
“संजय राऊत खोटं जरूर बोला… ते नवं नाही, पण किमान ‘सामना’ला तरी खोटं पाडू नये… संजय राऊत म्हणतात की ‘शिवसेना कधीच उमेदवारी यादी जाहीर करत नाही.’ हा दावा म्हणजे निव्वळ राजकीय विस्मृती नाही, तर उघड उघड इतिहासाशी केलेली फसवणूक आहे.”
इतिहासाचे दिले दाखले
भाजपने शिवसेनेच्या जुन्या कार्यपद्धतीची आठवण करून देताना म्हटले आहे की, लोकसभा असो, विधानसभा असो किंवा मुंबई महापालिका, शिवसेनेच्या उमेदवारांची यादी ही नेहमी ‘सामना’ पत्रातूनच अधिकृतपणे प्रकाशित होत आली आहे. आज उबाठा गट असो वा पूर्वीची शिवसेना, ‘सामना’ हेच शिवसेनेचे घोषणापत्र, आदेशपत्र आणि प्रचाराचे हत्यार राहिले आहे, असे असताना आज स्वतःच्याच वृत्तपत्राचा इतिहास नाकारणे हे चुकीचे असल्याचे उपाध्ये यांनी नमूद केले.
राजकीय अध:पतनाची टीका
“कालपर्यंत ज्याच्यावर पक्षाची ओळख उभी होती, आज त्याच ‘सामना’चा इतिहास नाकारणे हे राजकीय अधःपतन आहे,” असे म्हणत उपाध्ये यांनी राऊतांना सुनावले आहे. शिवसेनेचा इतिहास आणि ‘सामना’चा साक्षीदार खोटा ठरवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.