Wednesday, December 31, 2025

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं?

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले असतानाच, आता भाजपने या युतीवर सडकून टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे,” असे म्हणत उपाध्येंनी या युतीला ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ असा टोला लगावला आहे.

राज ठाकरेंच्या घरी फेऱ्या मारल्या, पण पदरात काय पडलं?
केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत रोखठोक मुद्दे मांडले आहेत. ते म्हणतात:

“आगामी निवडणुकीत उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे. पडेल जागा देत काँग्रेसने मुंबईत वंचितशी आघाडी केली, तर किरकोळ जागा देत उबाठाने मनसेला गुंडाळलं. सन्मानाच्या नावाखाली बोलावणं, वारंवार राज ठाकरेंच्या घरी फेऱ्या मारणं… ठाकरे ब्रॅन्डच्या घोषणा करणं हे सगळं उबाठाने केलं. पण प्रत्यक्षात मर्यादित जेमतेम ५० जागांवर समाधान मानायला लावलं… यालाच आवळा देऊन कोहळा काढणे म्हणतात!”

ठाकरे युतीवर भाजपचा प्रश्नचिन्ह
मुंबईच्या राजकारणात ‘ठाकरे ब्रँड’ एकवटल्याचा दावा शिवसेना (UBT) कडून केला जात असताना, भाजपने मात्र यातील ‘जागावाटपाचा’ मुद्दा समोर आणला आहे. २२७ जागांपैकी मनसेला केवळ ५० जागा देऊन उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची राजकीय कोंडी केल्याचे चित्र भाजपकडून रंगवले जात आहे. “राज ठाकरेंचा वापर केवळ प्रचारासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी केला जात आहे का?” असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख