Tuesday, October 14, 2025

पुण्यात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सव

Share

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे पुण्यात ‘स्वदेशी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठही मिळत आहे.

खादीच्या उत्पादनांना आणि ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे तसेच या वस्तूंचा वापर वाढावा या उद्देशाने पुण्यात ‘स्वदेशी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांकडून या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे आणि राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन नाना पेठेतील पूना गोअन इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले. हे प्रदर्शन १४ ऑक्टोबर पर्यंत रोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत खुले राहणार आहे.


प्रदर्शनाचे उद्घाटन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. स्वदेशी वस्तूंचा वापर वाढविणे हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण भागातील कारागीर, उद्योजक आणि महिला स्वयंसहायता गटांना व्यासपीठ मिळावे, बाजारपेठ मिळावी यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे, असे साठे यांनी सांगितले. 

उत्पादनांना प्रतिष्ठा द्याआपल्या देशातील उद्योगांना आपणच प्रोत्साहन द्यावे यासाठी स्वदेशी हा नारा आहे. स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे, त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. खादीचे कपडे, ग्रामोद्योगात तयार झालेल्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत आणि आपल्या उत्पादनांना आपण प्रतिष्ठा दिली पाहिजे, असेही साठे म्हणाले.

ग्रामोद्योगात जी उत्पादने घेतली जातात, त्याचा कच्चा मालही ग्रामीण भागातच तयार झालेला असतो. त्यामुळे तेथे तयार होणाऱ्या वस्तूंची खरेदी ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून अशा वस्तू आपल्या वापरात आणाव्यात असे आवाहन बाविस्कर यांनी केले. प्रदर्शनात काय काय…

प्रदर्शनात खादीचे कुर्ते, साड्या, पारंपरिक पद्धतीचे कपडे, महाबळेश्वरचा मध, मसाले, पापड, लोणची, दिवाळी फराळ, आकाशकंदील, हातकागदापासून तयार केलेल्या वस्तू, सेंद्रीय साबण, तेल, वनौषधी, तसेच लोकरीपासून तयार केलेल्या घोंगड्या, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू अशी विविध स्वदेशी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुणेकर नागरिकांकडून या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठ मिळत आहे.

मंडळाचे अधिकारी रवींद्र ठाकरे, नित्यानंद पाटील, शैलेंद्र कोलथरकर, सुधीर केंजळे यांची उद्घाटन कार्यक्रमात उपस्थिती होती. अमर राऊत यांनी सूत्रसंचालन केले.

अन्य लेख

संबंधित लेख