Thursday, December 18, 2025

‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (UBT) गटाने महाविकास आघाडीऐवजी (मविआ) मनसे सोबतच्या नव्या समीकरणांच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर बोचरी टीका केली आहे. “सत्तेसाठी तत्त्वं बदलणं हेच उबाठाचं ‘ब्रँड पॉलिटिक्स’ आहे,” अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडियावरून हल्लाबोल केला.

‘गरजेनुसार रंग बदलणारी नीती’
केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला “संधीसाधू” संबोधले आहे. ते म्हणाले की, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची गरज होती, तेव्हा मनसेवर जहरी टीका केली आणि त्यांना ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवले. मात्र, आता मुंबई महापालिकेत सत्तेचे स्वप्न दिसू लागताच काँग्रेस-मविआ नकोशी झाली असून अचानक दादरच्या ‘शिवतीर्था’वर वाऱ्या सुरू झाल्या आहेत.”

कौटुंबिक शिष्टाचारावरून घेरले
राज ठाकरे यांनी कौटुंबिक नाते जपण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, याची आठवण करून देताना उपाध्ये म्हणाले, “उबाठाने अमित ठाकरे यांच्याबाबत किमान कौटुंबिक शिष्टाचारही पाळला नाही. आज मात्र स्वार्थासाठी पुन्हा मनसेची मनधरणी सुरू केली आहे. कालपर्यंत सोनिया गांधींच्या चरणी लीन होणारे आज शिवतीर्थावर हजेरी लावत आहेत, हे सत्तेच्या आंधळ्या हव्यासाचे लक्षण आहे.”

मविआच्या ‘फेव्हिकॉल’ जोडावर प्रश्नचिन्ह
“मविआ २५ वर्षे फेव्हिकॉलसारखी टिकेल,” असे म्हणणाऱ्यांचे शब्द हवेत विरले असल्याची टीका करत उपाध्ये यांनी संभाजी ब्रिगेड, डावे पक्ष आणि समाजवादी पक्षांसोबतच्या युतीवरही भाष्य केले. महापालिकेत जागा द्याव्या लागतील या भीतीने आता या मित्रपक्षांची नावे घेण्याचीही हिंमत उबाठा गटात उरलेली नाही, असा दावा त्यांनी केला.

सत्तेसाठी तत्त्वांना तिलांजली
मुख्यमंत्री असताना विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी पंतप्रधान मोदींना केलेली विनवणी आणि काम झाल्यावर पुन्हा त्यांच्यावरच केलेली टीका, यावरून उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर निशाणा साधला. “उद्या मुंबई महापालिकेत पराभव झाला, तर हेच लोक मनसेला ‘टाटा-बाय बाय’ करतील आणि पुन्हा नवा चेहरा, नवा साथीदार शोधतील,” असे भाकीतही त्यांनी वर्तवले.

अन्य लेख

संबंधित लेख