Sunday, May 26, 2024

मुलाच्या शिकवणीमुळे मित्र पास झाला…

Share

सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची जगात ख्याती आहे. ही लोकशाही अधिक बळकट करण्याची संधी दर पाच वर्षांनी निवडणुकांच्या माध्यमातून येते. या निवडणुकांना यावेळी लोकशाहीचा उत्सव असं म्हटलं गेलंय. त्यासाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा १९ एप्रिलपासून सुरू झाला. देशाचे जागरूक नागरिक म्हणून मतदानाचं हे कर्तव्य प्रत्येकानं पार पाडणं आवश्यकच आहे.

गेल्या निवडणुकीतील ही घटना. माझ्या मित्राच्या घरातील.
ती माझ्यासाठी खरोखर संस्मरणीय म्हणावी अशीच.
निवडणुकीच्या मतदानाला प्रारंभ झाला आणि ती घटना पुन्हा प्रकर्षानं आठवली.

खरं तर माझ्या मित्राचा मुलगा अभ्यासात हुषार आहे. उत्तम गुण मिळवतो. दोघेही नवरा बायको जीवनाच्या शर्यतीत जिंकण्यासाठी धावत असतात. त्यामुळे शर्यत, एखाद्या मार्काचं महत्त्व व त्या साठी आटापिटा करणं, हे त्यांना चांगलंच माहीत आहे. त्यांच्या मुलाला हे माहिती आहे की नाही, हे त्यांना माहीत नाही आणि ते जाणून घेण्याएवढा वेळही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांनी कालोचित निर्णय घेतला की, मॅथ्स ( इंग्रजीमध्ये गणित) आणि सायन्स (अर्थात इंग्रजीमध्ये शास्त्र) याची शिकवणी ( समजणा-या भाषेत ट्यूशन) लावू यात.

थोडे दिवस गेले आणि लोकसभेच्या निवडणुका आल्या. मतदानासाठी दोघांना एकाच दिवशी सुट्टी मिळाली. मित्रानं चिरंजीवांना सांगितलं की उद्या सुट्टी आहे, दिवसभर कुठेतरी बाहेर ट्रीपला जाऊ. भटकायला जाऊ, लाॅंग ड्राईव्हला जाऊ वगैरे.

चिरंजीव सांतवे आसमान में असतील असं वाटलं त्याला, पण काहीतरी विपरीत घडलं. आज चक्क लेकाकडून नन्हाचा पाढा आला. बाबा उद्या सुटी नाही, उलट सर्वात महत्त्वाचं काम आहे नां, मुलगा विचारत होता. फक्त काम नाही, कर्तव्य आहे असं काल आमच्या बाई म्हणत होत्या, बाईंनी सांगितलं की, उद्या आई बाबांना महत्वाचं काम आहे. म्हणून बाहेर जाऊ, हॉटेलमध्ये जाऊ असा हट्ट करायचा नाही. मी तुम्हाला काय शिकवलं आहे की मतदान हा हक्क आहेच, पण ते कर्तव्य देखील आहे आणि तुमच्या हट्टापायी त्यांनी मतदान केलं नाही, तर ते पाप कुणाच्या डोक्यावर येईल.

आपण कुठे जायला नको. घरीच राहू या. तुम्ही घरी आल्यावर ते मशीन, त्यावरची नाव, चिन्ह कुठं होती, कशी होती, मतदानाची चिठ्ठी आली का हे सगळ मला सांगायचं. मग मी त्याच्यावर प्रोजेक्ट करीन… तो सांगत होता. मित्र आता निःशब्द होऊन गेला. किती छान विचार, तेही मुलाच्या तोंडून आलेले.

त्याला गणिताच्या शिकवणीची गरज आहे की नाही हे मित्राला माहीत नाही, पण मुलाने नागरिक शास्त्रासाठी माझ्या मित्राला शिकवणी आवश्यक आहे हे जरूर समजावून दिलं.

एका मतासाठी सरकारनं अरुणाचल प्रदेशमध्ये मतदान केंद्र उघडलं आहे. एका महिला मतदारासाठी शासकीय अधिकारी ४० किलोमीटरचं अंतर पार करून एंजवा जिल्ह्यातील मालोगाम या गावात गेले. चव्वेचाळीस वर्षीय सोकेला तयांगला मतदानाची सुविधा देण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मत महत्त्वाचं आहे, हाच संदेश यातून सरकार देतंय.

एका मताचं महत्त्व सांगणारी ही बातमी यंदा समजली.
शिवाय मुलाची शिकवणी.
मुलाच्या शिकवणीमुळे मित्र नागरिक शास्त्रीय कर्तव्यात यंदाही पास होणार आहे.
मतदान करणार आहे.

सुनील देशपांडे
(लेखक स्तंभलेखक आणि ब्लॉगर आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख