Saturday, May 25, 2024

महाड सत्याग्रह स्मरणदिनानिमित्त…

Share

घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला २० मार्च रोजी ९७ वर्षे होत आहेत. चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे अस्पृश्यतेविरूध्दच्या व्यापक लढ्याचा एक भाग होता. ती केवळ एक प्रतिकात्मक कृती नव्हती. त्यामागील विचार आणि भावना समजावून घेणे आवश्यक आहे. कोणताही समाजहितैषी या विचार आणि भावनांना कृतीशील समर्थन देईल.

या सत्याग्रहाचा विचार केला, तर ९७ वर्षात अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यात हिंदू समाजाने किती यश संपादन केले, हा खरा कळीचा मुद्दा आहे. शहरी भागात अस्पृश्यतेचा अनुभव सार्वजनिक जीवनातून जवळपास अस्तंगत झाला आहे. कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनात अजूनही काही प्रमाणात ही भावना किंवा हा विचार दिसून येतो. शहरी भागात आजही अनेक वस्त्या जातीआधारित आहेत. मात्र जातीची तीव्रता निश्चितच कमी झाली आहे. शहरा़मधे आंतरजातीय विवाहांमधे लक्षणीय वाढ झाली आहे, ही अत्यंत आशादायी गोष्ट आहे. आमचा बारा मित्रांचा एक ग्रुप आहे. चार दशकांपेक्षा अधिक काळाची मैत्री. बारापैकी सात जणांच्या मुलामुलींनी आंतरजातीय विवाह केला आहे. सारेजण सुखाने नांदत आहेत. एका मित्राचे कुटुंब तर पक्के परंपरावादी. तेही कुटुंब सुनेसमवेत आनंदात आहे.

अर्थात, याने लगेच हुरळून जाण्याचे कारण नाही. शहरी भागातील जातीय जाणीवा कमी झाल्या असल्या तरी देशभरच्या ग्रामीण भागात अजूनही सुधारणेला भरपूर वाव आहे. आजही अनेक गावांमध्ये मंदिर प्रवेश, पाणवठा आणि स्मशानभूमी हे वादाचे विषय आहेत. ऑनर किलिंगच्या घटना प्रामुख्याने ग्रामीण आणि निमशहरी भागात घडत असल्याचे दिसून येते. आंतरजातीय विवाहाला आजही ग्रामीण भागात अपेक्षित समाजमान्यता नाही. शहरांमधे शिकून जागरूक झालेल्या ग्रामीण भागातील तरुण पिढीला हे वास्तव अस्वस्थ करते आणि त्यांच्या मनात खळबळ माजते.

अनुसूचित जातीतील एका मित्राचा अनुभव विदारक आहे. भावंडांसोबत त्याचे बालपण खान्देशातील एका तालुक्याच्या ठिकाणी गेले. सर्व भावंडे उच्चशिक्षित, उत्तम अर्थार्जन आणि शहरात स्थायिक झालेली. या भावंडांना गावची नाळ तोडायची नव्हती. त्यांनी ठरवले की, गावात एक छोटा प्लॉट घेऊन छोटेसे घर बांधायचे. प्लॉट फायनल झाला, बोलणी झाली पण शेवटच्या क्षणी जमीन मालकाने व्यवहार करण्यास नकार दिला. नंतर त्यांना समजले की, प्लॉट खरेदीमधे जात आडवी आली होती.

आश्वासक घटना
अशा अनेक ज्ञात-अज्ञात घटना घडतात आणि वास्तवाचे भान येऊन समरसता प्रस्थापित करण्यामधील अडथळ्यांची जाणीव होते. अस्पृश्यता हा समाजाला झालेला मानसिक आजार आहे. कोणताही मानसिक आजार शारीरिक आजारापेक्षा जास्त धोकादायक असतो. मानसिक आजारांवरील उपचार प्रदिर्घ काळ चालतात. गोळी घेतली आणि डोकेदुखी थांबली, असे होत नाही. अस्पृश्यतेच्या मानसिक आजारावर प्रदीर्घ काळ उपचार करण्याची क्षमता राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरला रूग्णाप्रती किमान प्रेम आणि ममत्वाची भावना अपेक्षित असते. संघ अवघ्या हिंदू समाजाकडे याच ममत्वाच्या भावनेतून बघतो. सर्व समाज घटकांना समवेत घेऊन हिंदू संघटन करण्याचे संघाचे प्रयत्न आहेत. अयोध्येतील राम मंदिर हा हिंदू ऐक्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. जातीभेद आणि विषमतेला हिंदू ऐक्यामधे अजिबात स्थान नाही. जातभेदाला बाजूला सारल्याशिवाय हे हिंदू ऐक्य शक्यच झाले नसते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व जातीजमातीचे लोक प्रेमाने, भक्तिभावाने आणि उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. ही एक अत्यंत आश्वासक घटना आहे.

समरसतेची ही भावन सतत तेवत ठेवणे, हेच खरे आव्हान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांनी संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत (१७ मार्च) हीच भावना अधोरेखित केली. त्यांनी जातिभेदाचे वास्तव मान्य करीत असतानाच संघाचे प्रयत्न विशद केले. दत्तात्रेयजी होसबाळे यांनीसुद्धा पाणवठा, स्मशान आणि मंदिर यांचा उल्लेख केला. मात्र संघाची अशीही अपेक्षा आहे की, साऱ्या समाजाने या संदर्भात पुढे येणे आवश्यक आहे. अर्थात संघ याबाबत कायमच पुढाकार घेत आला आहे आणि घेत राहील. समरसता हा विषय संघाच्या प्राधान्य पत्रिकेवर आहे. होसबाळे यांनी व्यक्त केलेले एक मत विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. समरसता हा विषय संघासाठी धोरण (strategy) नसून श्रद्धा (faith) आणि मूल्यांशी (value) संबधित आहे. होसबाळे यांच्या विधानामुळे संघाची समरसतेप्रती असलेली प्रामाणिक बांधिलकी दिसून येते. विषमता आणि भेदभावाला संघात कधीही स्थान नव्हते. संघाच्या टीकाकारांनी कितीही अपप्रचार केला तरी संघ सर्व समाज घटकांमध्ये वेगाने वाढत आहे आणि हिंदू ऐक्याचे अनेक दाखले अनुभवास येत आहेत. संघाने प्रचलित केलेला ‘समरसता’ हा शब्द अधिक अर्थपूर्ण, गंभीर आणि भावनिक आहे. समरसता या शब्दातून मानवी भावनांचे प्रकटीकरण होते. या शब्दाला एका अर्थाने आध्यात्मिक आशयसुद्धा आहे, जो भारतीय विचार परंपरेशी सुसंगत आहे. समरसतेमधे समाजाचा तुकड्या तुकड्यात विचार अपेक्षित नाही. सर्व समाजाचा एकात्मिक विचार समरसतेमधे अपेक्षित आहे. जातिभेद आणि विषमता यासारख्या जटिल रोगांशी सामना करताना कदाचित अधिक वेळ लागू शकतो. मात्र हाच उपाय स्थायी स्वरूपाचा असेल.

महाड सत्याग्रह खरे तर शांततेत झाला होता. दुर्दैवाने एका अफवेमुळे या सत्याग्रहाला हिंसेचे गालबोट लागले होते. अफवा पसरवणारी मानसिकता आजही जीवंत आहे. किंबहुना हे ‘एलिमेंट्स’ अधिक सक्रिय आहेत. समाजमाध्यमांचा वापर यासाठी केला जातो. अफवा, बुद्धिभेद आणि असत्यतता आदी साधनांचा वापर करून हिंदू समाजात कायम असंतोष पेटवणे, हेच या मानसिकतेचे प्रमुख काम आहे. त्यांचा प्रतिवाद करीत शांतपणे समरसतेकडे वाटचाल करणे, हीच आपली जबाबदारी आहे. वेळ लागेल पण विजय निश्चित.

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख