मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची होणारी बदनामी आणि सायबर छळवणुकीच्या (Cyber Stalking) वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार माहिती तंत्रज्ञान (IT Act) कायद्यात आवश्यक बदल करणार आहे. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या (DGP) अध्यक्षतेखाली एक ‘विशेष समिती’ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (अ) सारख्या तरतुदींमध्ये सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी बदल केले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर राखून, सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कोणत्या कायदेशीर तरतुदी करता येतील, याचा ही समिती अभ्यास करेल.
सायबर गुन्ह्यांचा फटका समाजातील सर्व स्तरांतील लोकांना बसत असला, तरी महिलांना होणारा त्रास हा विशेषतः गंभीर स्वरूपाचा आहे. मॉर्फ फोटो, बनावट प्रोफाईल्स आणि ऑनलाइन ट्रोलिंगद्वारे होणारी बदनामी रोखणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारांना जरब बसेल अशा नवीन आणि ठोस तरतुदी कायद्यात सुचवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या समितीला दिले आहेत.