महाराष्ट्रातील साधुसंत व वीर महापुरुषांनी महाराष्ट्राला सतत समरस व एकतेच्या सूत्रात बांधून ठेवले आहे. सोबतच वैचारिक व सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा प्रगल्भ केले आहे. संत तुकाराम यांनी “भेदा भेद भ्रम अमंगळ” तथा “कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे” तसेच संत ज्ञानेश्वर माऊली यांचा “विश्व ची माझे घर” हा विशाल विचार दिला आहे. छत्रपती शिवरायांचा लढवय्या बाणा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या धमण्यातील वाहणाऱ्या रक्तात आजही कायम आहे. तसेच महाराष्ट्र सर्व क्षेत्रात प्रगत व समृद्ध आहे. लढवय्या असलेल्या महाराष्ट्राने अनेक वेळा देशाच्या सर्वच क्षेत्रात नेतृत्व सुद्धा केले आहे.
जेव्हा देश इस्लामी सत्तेच्या जोखडात खितपत पडला होता, तेव्हा शिवरायांनी इस्लामी सिंहासने उलथापालथ करून स्वराज्याची, अर्थात हिंदवी स्वराज्याची स्थापना करून देशाला इस्लामी सत्तेच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. अटकेपार भगवे ध्वज फडकविणारे महाराष्ट्रातील मराठेच होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इंग्रजांनी “लाल बाल पाल” यांची धास्ती घेतली होती. त्यातील बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्राच्या मातीत जन्मले होते व त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा महाराष्ट्रातून उभा केला होता.
जेव्हा देशावर विदेशी सीमापलीकडून आक्रमण झाली, तेव्हा “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धाऊन गेला” असे म्हटले जाते. तसेच महाराष्ट्राच्या नावा मध्येच राष्ट्र येत असून मराठा शब्द देश, देव, धर्मासाठी लढणारा शब्द आहे. त्यामुळेच देशाच्या राष्ट्रगीतामध्ये मराठा व सैन्यात मराठा रेजिमेंट शब्द अभिमानाने येतो. सेनापती बापट यांच्या “मराठा मेला तर महाराष्ट्र मेले” या कवितेतील अंगार लक्षात घेतला, तर महाराष्ट्र व मराठा शब्दाला देशात किती मोठा सन्मान व परंपरा आहे हे सहज लक्षात येते.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आपला मान वाढविला आहे. परंतु दुर्दैवाने, आज मराठा आरक्षणाच्या नावाखाली व अवास्तव मागण्या करून महाराष्ट्रात फार मोठी सामाजिक फूट पाडून सामाजिक वीण विस्कळीत करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोबतच कोणी महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा प्रयत्न करू पाहत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचा मणिपूर, बंगाल, आसाम होऊ द्यायचा नसेल, तर महाराष्ट्रातील सज्जन माणसाने राजकीय षड्यंत्र लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या भल्यासाठी, विकासासाठी महाराष्ट्र धर्म वाढवावा लागेल.
आपल्या देशात नजिकच्या काळात आरक्षणाच्या मुद्द्यावर देशाच्या विविध राज्यांत आंदोलने झालेली आहेत. गुजरातमधील पटेल, हरियाणामध्ये जाट यांचे मोठे आंदोलने झालेली आहेत. त्याचबरोबर बिहार व राजस्थानमध्ये आंदोलने झालेली आहेत व कालांतराने शांत सुध्दा झाली आहेत. आपल्या देशात आपल्या हक्क व न्यायासाठी लढण्याचा, संघर्ष व आंदोलन करण्याचा प्रत्येक माणसाला भारतीय राज्यघटनेने अधिकार दिला आहे. आंदोलन व संघर्ष करण्याचे लोकशाहीचे मार्ग उपलब्ध आहेत. पण ही आंदोलने राजकीय हेतूने किंवा राजकीय हस्तक्षेपाने प्रेरित होती.
आता महाराष्ट्रात मनोज जरांगे यांचे आरक्षण आंदोलन सुद्धा राजकीय हेतूने प्रेरित आहे. उद्धव ठाकरे यांचे मविआचे सरकार गेल्यानंतर आंदोलन सुरू झाल्यामुळे शंका घेण्यास प्रचंड वाव आहे. तसेच दडपशाही व राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या आंदोलनांमुळे समाजात कटुता व फूट निर्माण होत आहे. लोकशाही मार्ग आणि संवैधानिक, सनदशीर मार्गाचे आयुध उपलब्ध असताना आपल्या मागण्यासाठी दहशत निर्माण करणे, गावबंदी करणे, शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे? याचा अर्थ उपरोक्त प्रकार करणे म्हणजे लोकशाहीवर अविश्वास दाखवून सरळसरळ लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार किंवा लोकशाहीची पायमल्ली करण्याचा प्रकार नाही का?
उद्धव ठाकरे यांचे मविआ सरकार असताना असे प्रयोग का केले गेले नाहीत? आताच प्रयोग का केले जात आहेत? याचा अर्थ तुमचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नामदेवराव जाधव यांना काळे फासणे, राजकीय नेत्यांना गावबंदी करणे, क्षीरसागर परिवाराच्या घरांची जाळपोळ तसेच सरकारी वाहनांची मोडतोड करणे सारख्या मार्गाने महाराष्ट्र अस्थिर करून महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ते षड्यंत्र किंवा कुटील डाव हाणून पाडला पाहिजे. तसेच हे कारस्थान कोण रचत आहे, याचाही तपास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आज एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा राहू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.
निर्माण झालेल्या विदारक परिस्थितीवर सामाजिक संघटना, राजकीय पक्ष प्रमुखांनी सामाजिक एकता व सलोखा कायम राहण्यासाठी एकत्र येण्याची आणि महाराष्ट्र धर्म वाढविण्याची आवश्यकता आहे.
हिंदुस्तान इस्लामी सत्तेच्या गुलामीत असताना महाराष्ट्रातील साधुसंतांनी महाराष्ट्राचे प्रबोधन केले. तुकाराम महाराज यांनी “भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या मस्तकी हाणू काठी” ची शिकवण दिली. तर समर्थ रामदास यांनी “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” ही शिकवण देऊन अन्यायी इस्लामी सत्तेविरुद्ध सामान्य माणसाला लढण्याची प्रेरणा दिली.
शिवरायांनी अठरा पगड जाती व बारा बलुतेदार यांना भगव्या ध्वजाखाली एकत्र करून लढा उभारला होता. साधुसंतांच्या प्रेरणेने महाराष्ट्र परकीय शक्तीविरुद्ध लढला. सोबतच त्यांची सामाजिक सौहार्द टिकवून जातीय सलोखा कायम ठेवण्यात सुद्धा महत्वाची भूमिका निभावली आहे.
पण गेल्या दोन वर्षांपासून जातीअंता लढाई लढणारा पुरोगामी महाराष्ट्र, मराठा आरक्षण आंदोलनामुळे जातीय तीव्रतेने धगधगत आहे. गरजू मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे, ही सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे. महाराष्ट्र सरकार सुद्धा सकारात्मक व गंभीर आहे, कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठा समाजाचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागातील सामाजिक बांधिलकी व अर्थव्यवस्था मराठा समाजाने जोपासली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध होण्याचे कारण नाही.
पण महाराष्ट्रातील गेल्या एक वर्षांचा मागोवा घेतल्यास, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलन व विद्वेषी भूमिकेमुळे महाराष्ट्र अशांतेच्या दिशेने जात असून सामाजिक ऐक्याची वीण जाणीवपूर्वक विस्कळीत केली जात आहे. महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी नव्हे, तर मराठा विरुद्ध मराठा असा जातीय संघर्ष उभा करण्याचा डाव सुरू आहे. तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची वीण विस्कळीत करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करून एक संघ ठेवायचा असल्यास, सर्वांना आता महाराष्ट्र धर्म वाढवावा लागेल.
अशोक राणे
अकोला