Thursday, November 13, 2025

महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल”  

Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मुंबई येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाने आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ चे उदघाटन पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ‘यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करून ‘प्री-इनक्युबेशन सेंटर’ चे उदघाटन करून ते कार्यान्वित केले.

महिलांचा सशक्त सहभागराष्ट्र विकासासाठी आवश्यक: मुख्यमंत्री फडणवीस

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, १९१६ मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाची स्थापना झाली, तर युनायटेड किंगडमसारख्या विकसित राष्ट्रात महिलांना मतदानाचा हक्क २ वर्षांनी, १९१८ मध्ये मिळाला.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जगावर राज्य करणाऱ्या विकसित राष्ट्रालाही लोकशाहीतील महिलांच्या सहभावाचे महत्त्व समजायला जिथे २ वर्ष लागली तिथे, महर्षी कर्वे यांनी हे आधीच ओळखले होते की, एखादे राष्ट्र विकसित व्हायचे असेल तर महिलांचा सशक्त सहभाग आवश्यक आहे.

‘स्टार्ट-अप कॅपिटल’ महाराष्ट्र: महिला-नेतृत्वातील उद्योगांना विशेष प्राधान्य

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवकल्पना (इनोव्हेशन) आणि स्टार्ट-अप्सच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, नवकल्पना हे एकमेव साधन आहे, ज्यामुळे आपण झपाट्याने प्रगती करू शकतो आणि लोकांच्या जीवनात बदल घडवू शकतो.

नवीन धोरण: महाराष्ट्र शासनाने स्टार्ट-अप, इनोव्हेशन आणि उद्योजकता धोरण जाहीर केले आहे. अधिकाधिक इन्क्युबेटर्स आणि नवीन प्लॅटफॉर्म तयार करून नवकल्पनांना पाठबळ देणे हा या धोरणाचा उद्देश आहे.

स्टार्ट-अप इंडियाचे कौतुक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये मांडलेल्या स्टार्ट-अप इंडिया संकल्पनेमुळे आज भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्ट-अप इकोसिस्टम बनला आहे आणि दुसऱ्या क्रमांकाकडे वेगाने वाटचाल करत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

महिला उद्योजकता: महाराष्ट्र हे देशाचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’ आहे. महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ आणि भारताला ‘पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ बनवण्यासाठी महिलांचा सहभाग निर्णायक ठरणार आहे. राज्यात एकूण स्टार्ट-अप्सपैकी ४५ टक्के स्टार्ट-अप्स महिला नेतृत्वाखाली आहेत. महाराष्ट्र शासनाने स्टार्ट-अप धोरणात महिला-नेतृत्व असलेल्या स्टार्ट-अप्सना विशेष प्राधान्य दिले आहे.

महिला या क्षेत्रात लवकरच आघाडीवर असतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.उज्ज्वला चक्रदेव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख