मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकासकामांच्या बळावर आधीच जिंकले असून, मुंबईचा विकास करण्याची क्षमता फक्त महायुतीकडेच आहे, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नवनाथ बन म्हणाले की, मतदारांनी महायुतीचा साडेतीन वर्षांचा विकासाचा कारभार जवळून पाहिला आहे. त्याचबरोबर गेल्या २५ वर्षांतील मुंबई महापालिकेतील कारभार आणि उबाठा सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात घरी बसून चालवलेला कारभारही जनतेच्या लक्षात आहे. त्यामुळे विकासासाठी मतदार महायुतीलाच आशीर्वाद देतील आणि राज्यातील सर्व २९ महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी माणसासाठी शेवटची लढाई असल्याचा दावा करणाऱ्यांवर टीका करत बन म्हणाले की, ही लढाई मराठी माणसासाठी नसून एका कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वासाठी आहे. यावेळी त्यांनी मुंबईत उबाठा गटाकडून लावण्यात आलेल्या बिना नावाच्या पोस्टर्सवरून उबाठा गट व संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उबाठा गटाला स्वतःच्या नावाने पोस्टर लावण्याचीही हिंमत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
आचारसंहिता लागू असताना लावण्यात आलेल्या अशा अनधिकृत पोस्टर्सची चौकशी व्हावी, अशी मागणी करत बन म्हणाले की, ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या म्हणीप्रमाणे ही पोस्टर्स फाटली असून, मुंबईत महायुतीचा हिरो बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या नावाने पोस्टर्स लावल्यास मते मिळणार नाहीत, या भीतीपोटीच उबाठा गटाने बेनामी पोस्टर्स लावल्याचा आरोपही त्यांनी केला. या पोस्टर्सवरील खर्चाकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मनसेमधील सात नगरसेवक फोडून पक्षात घेतल्यावेळी पैशांचा बाजार उबाठा गटानेच मांडला होता, अशी आठवण करून देत बन यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि उबाठा गटावर टीकेची झोड उठवली. सूर्य चंद्र हे कुणाचे बाप आहेत का आई आहेत का या बुद्धी भ्रष्ट झालेल्या राऊतांच्या वक्तव्यावर निशाणा साधत बन म्हणाले की हल्ली राऊत आणि उबाठा गटाला सूर्य नाही तर त्यांना चांद जास्त प्रिय झाला आहे. हिरव्या झेंड्यावर असलेला चांद हा त्यांच्या पक्षाचा झेंडा झालेला आहे म्हणूनच असे बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे वक्तव्य ते करत आहेत.
मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याचा आरोप करणाऱ्यांवर पलटवार करत बन म्हणाले की, ज्या उद्योगपतींच्या घरच्या लग्नसमारंभात उबाठा गटातील नेत्यांनी सहभाग घेतला, त्यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. मुंबई कोणत्याही उद्योगपतीच्या घशात जाणार नाही; ती सर्वसामान्य नागरिकांची आणि मराठी माणसाचीच आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना बन म्हणाले की, त्या पक्षात सुरुवातीपासून एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर भाजपामध्ये सामान्य कार्यकर्ता देखील राष्ट्रीय अध्यक्ष होतो. हाच भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यपद्धतीतील मूलभूत फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.