मुंबई : राज्यात गोमांस तस्करी (Beef Smuggling) वारंवार करताना आढळून आल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) (Mcoca Act) लावण्यात येईल. यासंदर्भात आगामी अधिवेशनात गोमांस तस्करीविरोधात स्वतंत्र कायदा करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी विधान परिषदेत दिली.
राज्याने महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) विधेयक, १९९५ अंतर्गत गोहत्या, विक्री आणि गोमांस वाहतूक बंदी घातली आहे. जून 2022 ते 2025 दरम्यान राज्यात गोवंश हत्या, वाहतूक व विक्रीप्रकरणी 2,849 गुन्हे दाखल करण्यात आले असताना 4,678 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, 1,724 टन मांस जप्त केल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.
भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी हा विषय उपस्थित केला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदराबादहून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबईच्या दिशेने निर्यातीसाठी घेऊन जात असताना दोन ट्रक कंटेनर पकडले. मे. एशियन फुड्स् मीम अॅग्रो या कंपनीकडून या गोमांसाची निर्यात होते. याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करून संबंधितांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी भारतीय यांनी केली.
त्यावर राज्यमंत्री भोयर म्हणाले, पुण्याच्या मौजे कुसगाव येथे 25 मार्च 2025 रोजी सुमारे 57 हजार किलो गोवंशीय मांस दोन मोठ्या कंटेनरमध्ये वाहतूक करताना आढळून आले. याप्रकरणी एशियन फूड कंपनीचे मालक व इतरांनी ई-वे बिल, इनवर्ड्स आदी बनावट कागदपत्रांच्या आधारावर शासनाची फसवणूक केली. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून, संबंधित कंपनीचा परवाना रद्द करण्याची विनंती केंद्राकडे केली आहे. याप्रकरणी कंपनीचे दोन मालक आरोपी आहेत. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन जामीन मिळाला आहे, तर दुसर्या आरोपीच्या अटकेसाठी प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत तपास करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की, अशा (गोमांस तस्करीच्या) घटना रोखण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कधीकधी खटलेही येतात. “अशा गोरक्षकांवर अन्याय होऊ नये. त्यांच्यावर खटले का दाखल केले जातात याची चौकशी झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
भोयर म्हणाले, जर अशा प्रकारचे सामाजिक कार्य करणाऱ्या गोरक्षकांवर गुन्हे दाखल झाले असतील तर त्याचा आढावा घेऊन गुन्हे मागे घेण्याच्या द़ृष्टीनेही विचार केला जाईल, अशी ग्वाही पंकज भोयर यांनी परिषदेत दिली.