मुंबई : अमेरिकेतील ‘एपस्टीन फाईल्स’चा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप करत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी काल या विधानांचा तीव्र निषेध करत ‘जोडेमार आंदोलन’ केले.
‘म्हातारचळ लागल्याची’ बोचरी टीका
आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार भातखळकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांना वयाच्या ७८ व्या वर्षी जर ‘एपस्टीन फाईल्स’ आठवत असतील, तर त्यांना नक्कीच म्हातारचळ लागला आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि काँग्रेस नेतृत्वाचे लाळघोटेपणा करण्यासाठी ते अशा प्रकारचे अत्यंत खालच्या पातळीचे उद्योग करत आहेत.”
भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप
केवळ पंतप्रधानच नव्हे, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय सैन्याचाही अपमान केल्याचा गंभीर आरोप भातखळकर यांनी केला. चव्हाणांची विधाने देशद्रोही स्वरूपाची असून, यामुळे देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल तात्काळ माफी मागावी. त्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाईल. तसेच, भविष्यात त्यांनी भाजप नेत्यांविरुद्ध अशाच कुचाळक्या सुरू ठेवल्यास त्यांचे तोंड काळे करण्याचे काम भाजप हाती घेईल. आमचा संयम आता संपला आहे,” असे ते म्हणाले.
या आंदोलनात कांदिवली पूर्व मतदारसंघातील शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. “सध्या फक्त फोटोला जोडे मारले आहेत, हे लक्षात ठेवावे,” असा इशाराही भातखळकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिला आहे.