Friday, November 28, 2025

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

Share

ठाणे/मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे प्रमुख नेते आणि ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भोईर यांनी अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

प्रकाश भोईर यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि पक्षाच्या सध्याच्या भूमिकेवर असंतोष व्यक्त करत राजीनामा दिल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र, त्यांनी राजीनाम्याचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रकाश भोईर यांचे पुढील राजकीय पाऊल काय असेल, याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप प्रवेशाचे संकेत?
प्रकाश भोईर यांच्या राजीनाम्यामागे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झालेले गणित असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एका कार्यक्रमात प्रकाश भोईर हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत एकाच मंचावर उपस्थित होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची प्रमाणात चर्चा रंगली होती. त्यावेळी लवकरच प्रकाश भोईर वंदे मातरम म्हणतील असं विधान रवींद्र चव्हाण यांनी केले होते.आगामी काळात ठाणे आणि मुंबईतील महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता, मनसेतील एका प्रमुख नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास तो राज ठाकरे यांच्या मनसेला निश्चितच मोठा फटका बसणार आहे.

भोईर हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये मनसेचे एक प्रभावी आणि जुने नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख