Friday, November 8, 2024

भारताचे सुवर्ण युग सुरू 

Share

असे म्हणतात की, कधीकाळी भारतात साेन्याचा धूर निघायचा! मात्र, येथील समाज एकसंध नसल्याने देश गुलामगिरीच्या जाेखडात अडकला आणि शेकडाे वर्षे परकीयांनी भारतीय संपत्तीची अमाप लूट केली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी आपापल्या परीने सर्वांनीच याेगदान दिले. आधी लाेकमान्य टिळक व नंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. या आंदाेलनात सक्रिय सहभागी असलेल्या केशव बळीरामपंत हेडगेवार या तरुणाला ‘भारत गुलामीत का गेला?’ असा प्रश्न पडला आणि रा. स्व. संघाची स्थापना झाली. १९४७ साली इंग्रजांनी देशातून काढता पाय घेतला. उद्देश पूर्ण झाल्याने काँग्रेसच्या विसर्जनाचा प्रस्ताव महात्मा गांधींनी ठेवला. पण, सत्तेची लालसा बाळगणाऱ्यांना ही बाब मान्य हाेणे शक्यच नव्हते!  

सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेल्या काँग्रेसचे राज्य आले. आणि देशाला लुटण्याची नवीन पद्धत अस्तित्वात आली. काेणी शिक्षण महर्षी झाले तर काेणी शिक्षण सम्राट बनले! शाळा-महाविद्यालये, साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका अशा सर्वच व्यवस्थांवर या लाेकांनी कब्जा करून दीर्घकाळ राज्य केले. खूप वर्षांपूर्वी तरुण भारतमध्ये एक कविता प्रकाशित झाली हाेती. ‘तुम्ही थाेर झालेत शिक्षण महर्षी, नित्य राहाे खुशी सत्तांगणी’ अशी एक ओळ त्या कवितेत हाेती. आज मला या कवितेचा भावार्थ कळला आहे. 

ज्यांच्याकडे कधी दाेन एकरही शेत नव्हते, ते सत्तेत येताच जमीनदार कसे काय बनले असेल? नोकऱ्या देण्याच्या नावावर सुशिक्षितांची अक्षरश: लूट करण्यात आली. या लाेकांनी जनतेचा पैसा खोऱ्याने ओढला आणि ढेकर न देता जिरवलासुद्धा! प्रतिस्पर्धी निर्माण हाेऊ नये म्हणून गुंडापुंडांची मदत राजकारणी घेऊ लागले आणि राजकारणात गुंडशाही फोफावली. याचा सर्वाधिक त्रास गाेरगरिबांना झाला. हे असले घाणेरडे राजकारण देशवासीयांनी खपवून घेतलेच कसे, असा प्रश्न आज पडताे. गुंडांच्या मदतीशिवाय राजकारण हाेऊ शकले नसते का? राजकारणाच्या जाेरावर अमाप संपत्ती कमावण्याचा नवा पायंडा पडला. आणि प्रत्येकच जिल्ह्यात घराणेशाही अस्तित्वात आली. 

परंतु, परिवर्तन संसाराचा नियम आहे. आता काळ बदलला आहे. भारतीयांना उशिरा का हाेईना सत्य कळून चुकले आणि मतदारांनी ६ दशकांची मानसिक मरगळ झटकताच एका सुवर्ण युगाचा उदय झाला. भाजपा सरकार सत्तेत येताच प्रथम रस्त्यांच्या विकासाचा झंझावात सुरू झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी संपूर्ण देशात रस्त्यांचे मजबूत जाळे विणले. प्रत्येकच रस्ता चकचकीत झाला. अशाही परिस्थितीत मानसिक गुलामांनी सिमेंटच्या रस्त्यांमुळे आमच्या वाहनांचे टायर्स खराब हाेतात, असा अफलातून युक्तिवाद केला! 

मुस्लिमांना माेदींपासून भीती दाखविण्याचे पातक काँग्रेसने वारंवार केले. वास्तविक भाजपाच्या काळातच मुस्लिम स्वत:ला अधिक सुरक्षित समजू लागला आहे. पंतप्रधानांनी जम्मू-काश्मिरात ३६ हजार काेटी रुपयांच्या विकास याेजनांचा शुभारंभ केला. काश्मिरला पहिली विजेवर धावणारी रेल्वे गाडी मिळाली. पर्यटकांची संख्या वाढल्याने तेथील बेराेजगार तरुणांना राेजगार मिळाला. त्यामुळेच ५०० रुपयांसाठी जवानांवर दगडेक करणारी तरुणाई माेदी सरकारचे गुणगान गात आहे. जम्मू-काश्मिरला दाेन एम्स रुग्णालये मिळालीत. जम्मू-काश्मिरातील नागरिक प्रचंड आनंदी असून नेहमी माेदींचेच सरकार राहाे, अशी करुणा ते आता भाकू लागले आहे. 

कलम ३७० हटविण्याचा मुद्दा पुढे येताच सर्वात आधी काश्मिरातील फुटीरतावादी आणि काँग्रेसने कडाकडून विराेध केला. हे कलम हटताच या लाेकांची वर्षानुवर्षांपासूनची दुकानदारी संपुष्टात आली. आज हा प्रदेश माेकळा श्वास घेत आहे. आणि हे केवळ माेदी आणि त्यांच्या शिलेदारांच्या देशभक्तीमुळेच शक्य हाेऊ शकले आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत विकासाचे वारे वाहू लागले असून लवकरच भारत जगात क्रमांक ३ ची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, अशी गॅरंटी माेदींनी देशवासीयांना दिली आहे. 

जगात तीन प्रकारचे लाेक असतात. पहिले जे केवळ बाेलतात, दुसरे जे बाेलतात आणि करूनही दाखवितात. तिसरे म्हणजे न बाेलताच करून दाखवितात. माेदी यापैकी कुठले आहे, हे देशवासीयांना ठरवायचे आहे. पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारत साेडला तर आज संपूर्ण देशात भाजपाची लाट आहे. आणखी ३० वर्षे भाजपा सत्तेत राहिल्यास या देशाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देशवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. आज देशाच्या सुवर्ण युगाचा काळ सुरू झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. देशवासीयांनी आपल्या मनातील देशभक्ती अशीच जागृत ठेवली तर भारत एक दिवस विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास वाटताे.

पुंडलिक आंबटकर
नागपूर

अन्य लेख

संबंधित लेख