Sunday, November 24, 2024

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून एकही पात्र महिला वंचित राहू नये : पालकमंत्री गिरीश महाजन

Share

नांदेड : राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या, आणि ग्रामीण व शहरी भागातील गरीब महिलांच्या आर्थिक विकासाच्या या महत्त्वपूर्ण योजनेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाज घटकातील गरीब, गरजू, महिला या आर्थिक सक्षमीकरणातून आर्थिक स्वातंत्र्य अनुभवणार आहे. राज्य शासनाने या योजनेच्या प्राथमिक अंमलबजावणीत आलेल्या अनुभवावरून अधिक सोपी व सुलभ अशी अर्ज स्वीकारण्याची पद्धत तयार केली आहे. 12 जुलै रोजी काही सुलभ पद्धती नव्या शासन निर्णयात सुचविण्यात आलेल्या आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी. यंत्रणेने सर्व नवीन बदल लक्षात घेऊन कार्यरत व्हावे. तसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही समाजातील सर्व घटकांसाठी आहे. यातून एकही पात्र महिला लाभार्थी सुटणार नाही याची काळजी गाव स्तरावर ग्राम समितीने तर शहरात वार्ड समितीने घ्यावी. तसेच यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, असे आवाहन नांदेड (Nanded) जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यामधील सर्व समाज घटकातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. योजना कायमस्वरूपी असून दीर्घकाल चालणार आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेच्या बाबतीत चुकीच्या नकारात्मकता पसरवणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करून सर्व जाती-जमातीतील महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या सहभागात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अतिशय उत्तम काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचा नियमित आढावा आपण घेत असून जिल्ह्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याची निर्देश आपण दिले असल्याची त्यांनी सांगितले आहे.

सर्व घटकातील, सर्व पक्षातील, तसेच सामाजिक क्षेत्रातील सर्व नागरिकांनी आपापल्या घरातील गरीब,गरजू , पात्र महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आलेल्या या योजनेमध्ये सहभागी होण्यास मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. महिन्याला 1500 रुपये, वर्षाला 18 हजार रुपये आपल्या घरातील महिलेला मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने पात्र ठरणाऱ्या महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अन्य लेख

संबंधित लेख