मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला आहे. मराठी माणसाने दिलेले प्रेम आणि सत्तेचा ठाकरे बंधूंनी केवळ स्वार्थासाठी वापर केला आणि मुंबईला ‘भकास’ केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष”
केशव उपाध्ये यांनी आपल्या वक्तव्यात ठाकरे बंधूंना थेट प्रश्न विचारला आहे:
“मराठी माणसाने ठाकरे बंधूंना भरभरून प्रेम दिले, सत्ता दिली, सन्मान दिला. पण परत काय मिळाले? भकास मुंबई, आणि त्यांच्या स्वार्थी भावनिक राजकारणापायी निर्माण झालेला द्वेष.”
अर्णव खैरे मृत्यू प्रकरणावरून टीका
उपाध्ये यांनी अलीकडील अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूच्या घटनेवरून ठाकरे बंधूंवर थेट निशाणा साधला.
“अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूच्या पापातून ठाकरे बंधूंना सुटता येणार नाही,” असे उपाध्ये म्हणाले.
“भाषिक द्वेषाचे जे कारखाने त्यांनी चालवले, त्यातूनच हा मृत्यू घडला आहे. ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाही!” असे अत्यंत महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले.
भाजपच्या मते, ठाकरे बंधूंचे राजकारण हे केवळ भावनिक आणि स्वार्थी हेतूंनी प्रेरित आहे. मुंबई आणि मराठी माणसाचा विकास हे भाजपचे उद्दिष्ट असून, ठाकरे बंधूंनी केलेल्या द्वेषाच्या राजकारणाला मुंबईकर जनता येत्या निवडणुकीत योग्य उत्तर देईल, असा विश्वास उपाध्ये यांनी व्यक्त केला.