Wednesday, December 24, 2025

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा!

Share

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. या यादीतील विशिष्ट धर्माच्या उमेदवारांच्या संख्येवरून भाजपने काँग्रेसवर ‘व्होटबँक’ राजकारणाचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या या अजेंड्याचा पर्दाफाश करत, “काँग्रेस आता मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल टाकत आहे,” अशी घणाघाती टीका केली आहे.

हा योगायोग नाही, तर हिंदुविरोधी अजेंडा!
नवनाथ बन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “४० स्टार प्रचारकांपैकी १० नावं एका विशिष्ट धर्मातील असणं हा योगायोग नसून उघड उघड धर्माधारित व्होटबँकेचा अजेंडा आहे. जेव्हा विकास आणि नेतृत्व शून्य होते, तेव्हा काँग्रेसला अशा हिंदूविरोधी अजेंड्याचा आधार घ्यावा लागतो.”

महाराष्ट्र ही फाळणीची प्रयोगशाळा नाही!
काँग्रेसच्या या भूमिकेचा समाचार घेताना भाजपने स्पष्ट इशारा दिला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ही अशा प्रकारच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीची किंवा फाळणीच्या विचारांची प्रयोगशाळा होऊ शकत नाही. काँग्रेसने मुस्लिम लीगच्या विचारसरणीचा अंगीकार करून महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

जनता चोख उत्तर देणार
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने केलेल्या या ‘तुष्टीकरणाच्या’ राजकारणामुळे बहुसंख्य समाजात संतापाची लाट असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत जनता काँग्रेसला त्यांच्या या धोरणाबद्दल चोख उत्तर देईल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख