Tuesday, September 17, 2024

हिंदू परंपरेचा ऐतिहासिक वारसा म्हणजे नागपूर नगरीतील उत्सव – मारबत !!

Share

हिंदू परंपरेचा ऐतिहासिक वारसा म्हणजे नागपूर नगरीतील मारबत उत्सव – मारबत !!

‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’…..

मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार पौराणिक काळापासून बघितला जाणारा एक प्रकार आहे.

सोबतच मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सुद्धा बरेच वर्षापासून जनजाती समाजात मारबत काढण्याची व दहन करण्याची पौराणिक परंपरा आपल्याला पाहायला मिळते.

नागपूर मध्ये हा उत्सव जवळपास 140 व 144 वर्षपासून केला जातोय. काळी मारबत व पिवळी मारबत अश्या मुख्य दोन मारबत व सोबत अनेक मारबत काढल्या जातात. ऐतिहासिक परंपरेचे जतन नागपूर अनेक वर्षापासून करत आहे असे सुद्धा म्हणता येईल.

ऐतिहासिक परंपरेचं जतन :
धावपळीच्या युगात आपल्याला आपल्याच संस्कृतीचा विसर पडतोय, असं असताना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुर शहरानं 144 वर्षे जुन्या ऐतिहासिक परंपरेचं जतन केलंय. समाजातील अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्याच्या हेतूनं बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते. काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. ‘मारबत’ म्हणजे वाईट रुढी- परंपरा, अंधश्रद्धेच दहन करणं आणि चांगल्या परंपरा, विचारांचं स्वागत करणं हा या मागचा एक उद्देश. कृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचं प्रतीक ‘काळी मारबत’, तर लोकांचं रक्षण करणारी ‘पिवळी मारबत’ आहे. यांच्या दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात.

मारबत उत्सव म्हणजे काय? :
जगभरात प्रसिद्ध झालेला बडग्या-मारबत उत्सव व मिरवणूक हा प्रकार फक्त नागपुरात बघायला मिळतो. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं पुण्यात गणेशोत्सव सुरू केला, त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातदेखील देखील ‘मारबत’ उत्सव सुरू करण्यात आला होता. ‘मारबत’ उत्सवाकडे गणेशोत्सवापेक्षा जुना उत्सव म्हणून पाहिले जातं. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या. त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्यानं त्या रूढी परंपरांचं उच्चाटन व्हावं, म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातो. ‘मारबत’ उत्सव साजरा करण्यामागं एक उद्धिष्ट आहे. ते म्हणजे, वाईट रूढी परंपरा व अंधश्रद्धेचा दहन करून चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत करणं.

पिवळी मारबतीची परंपरा :
नागपूरच्या जगनाथ बुधवारी भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी ‘पिवळी मारबत’ उत्सव 1885 साली साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी पिवळ्या मारबतीला 140 वर्ष पूर्ण झाले आहेत. लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढल्यानंतर तिचं दहन केलं जातं. विशेष म्हणजे, लहान मुलांना घेऊन महिला दर्शनासाठी येतात.

काळी मारबतीची परंपरा :
भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती. त्याविरोधात ‘काळी मारबत’ काढली जाते, त्याच बरोबर ‘काळी मारबती’ला महाभारताचा संदर्भ देखील दिला जातो. आज काळी मारबत या परंपरेला 144 वर्ष पूर्ण झाले आहेत.

अशा या पौराणिक व ऐतिहासिक मारबत उत्सवाला पूर्ण नागपूर जिल्ह्यातून व सोबतच महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अनेक भागातून नागरिक उत्सव पाहायला व उत्सव साजरा करायला त्याचा आनंद घ्यायला नागपूर येथे येतात.

अन्य लेख

संबंधित लेख