नांदेड : शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या ऐतिहासिक ‘शहीदी समागम’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज होत आहे. या महासोहळ्याचे विचार खेडोपाडी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या प्रसिद्धी कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पापळकर यांनी प्रसिद्धी यंत्रणेला मार्गदर्शन केले. गुरुजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर द्या, असेही ते म्हणाले.
शिक्षण विभागासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी शिक्षण विभागाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे जितेंद्र पापळकर यांनी नमूद केले. शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरी, निबंध, चित्रकला, प्रश्नमंजुषा आणि समूहगान असे उपक्रम राबवून विद्यार्थी व पालकांपर्यंत कार्यक्रमाचा संदेश पोहोचवावा. तसेच, शासकीय कार्यालये, पेट्रोल पंप आणि सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्ज लावून वातावरण निर्मिती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नियोजनावर भर दिला. ते म्हणाले, की मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबतच सोशल मीडियाचा (समाज माध्यमे) प्रभावी वापर करून राज्यासह राज्याबाहेरही या कार्यक्रमाची माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.
१० लाख भाविकांची उपस्थिती; आंतरराष्ट्रीय महत्त्व
हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक ऑनलाईन माध्यमातून म्हणाले, की हा कार्यक्रम देश-विदेश पातळीवर अत्यंत महत्त्वाचा आहे. या महासोहळ्यात केवळ शीख समाजच नव्हे, तर सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव समाज आदी समाजासह इतर समाज असे मिळून सुमारे १० लाख भाविक सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रसिद्धीची व्याप्ती मोठी असावी.