मुंबई : “महायुती सत्तेत आली तर मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ होईल, अशी भीती उद्धव ठाकरे दाखवत आहेत. मात्र, ते कधीही शक्य नाही. पण उद्धव ठाकरे जर सत्तेत आले, तर ते मुंबईचे ‘मोहम्मद लैंड’ केल्याशिवाय राहणार नाहीत,” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा (X) आधार घेत अत्यंत आक्रमक भूमिका मांडली.
मुंबईच्या अस्मितेवरून राजकारण तापलं
उद्धव ठाकरे यांनी एका विधानात म्हटले होते की, महायुती सत्तेत आल्यास मुंबईचे नाव बदलून पुन्हा ‘बॉम्बे’ करण्याची शक्यता आहे. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, मुंबईच्या अस्मितेशी खेळणे कोणालाही शक्य नाही. उलट, उद्धव ठाकरेंच्या सध्याच्या राजकारणामुळे आणि ‘जनाब सेने’च्या भूमिकेमुळे मुंबईच्या लोकसंख्येचे स्वरूप बदलून ते शहराचे इस्लामीकरण करतील, असा गंभीर आरोप राणे यांनी केला.
‘मोहम्मद लैंड’च्या विधानाने खळबळ
नितेश राणे यांनी थेट “मोहम्मद लैंड” हा शब्द वापरल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. “ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन करत आहेत आणि रोहिंग्या-बांगलादेशींचे समर्थन करत आहेत, त्यावरून मुंबई सुरक्षित राहणार नाही,” असे संकेत त्यांनी दिले. मुंबईला वाचवण्यासाठी भाजप-महायुतीचा ‘हिंदुत्वाचा भगवा’ महापालिकेवर फडकवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.