Thursday, October 10, 2024

गणेशोत्सव काळात गणवेशात नृत्य करण्यास मुंबई पोलीस आयुक्तांची मनाई

Share

मुंबई, पुण्यासह राज्यभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात पोलीस गणवेशात मिरवणुकीत किंवा इतर ठिकाणी नृत्य करण्यास मुंबईत पोलीस आयुक्तांनी मनाई केली आहे. अन्यथा कारवाईचे आदेश दिले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सुरक्षाव्यवस्था व पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुंबईत पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान गणवेशावर नाचू नये, अशी सक्त ताकीद दिली आहे. तसेच, असे करताना कोणता पोलीस अधिकारी वा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी त्यांच्या गणवेशाचा आदर राखला पाहिजे, अशा सूचना फणसाळकर यांनी दिल्या आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये काही पोलिसांचे गणवेशात नाचतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मुघल-ए-आझम चित्रपटातील ‘किसी दिन मुस्कुरा कर ये नजारा हम भी देखेंगे’ या गाण्यावर सदर महिला अधिकारी नाचताना दिसत आहे. यावर अनेक युजर्सनं टीकात्मक पोस्टही केल्या होत्या.

अन्य लेख

संबंधित लेख