Wednesday, March 11, 2026

मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान

Share

पुणे : “सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे,” असे परखड मत ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विवेक विचार मंच आणि इतर संस्थांच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये ‘मूलभूत इस्लामची शिकवण’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, पुण्याचे माजी खासदार प्रदीपदादा रावत आणि राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवळे उपस्थित होते.

प्रा. मोरे यांनी कुराण समजून घेण्यासाठी प्रेषित पैगंबरांच्या चरित्राचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. म्हणाले, “प्रेषितांच्या चरित्रातून कुराणातील कोणती आयत कोणत्या प्रसंगात आली आहे, याचा बोध होतो. आज काही आयतांचा वापर ‘इस्लाम सहिष्णू आहे’ हे दाखवण्यासाठी केला जातो. मात्र, प्रत्यक्षात इस्लामला अल्लाशिवाय दुसरी कोणतीही श्रद्धा मान्य नाही. संपूर्ण जगाला इस्लामिक दृष्टिकोनातून श्रद्धावान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. अल्लाला न मानणाऱ्यांना शिक्षा देण्याचा अधिकारही ते स्वतःकडेच घेतात. इस्लामची शक्ती वाढल्यानंतर ‘काफिरां’विरुद्ध जिहाद करणे अनिवार्य मानले गेले आहे.”

अध्यक्षीय भाषणात प्रदीप रावत यांनी नमूद केले की, जोपर्यंत आपण आपला ‘सिव्हिलायझेशनल डीएनए’ (सांस्कृतिक वारसा) समजून घेत नाही, तोपर्यंत हा प्रश्न उमजणार नाही. इस्लाम केवळ वेगळा पंथ किंवा पूजापद्धती नाही. त्यामुळे इस्लामच्या प्रश्नाकडे हिंदूंच्या सहिष्णू दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे ठरते. मुस्लिमांकडे इस्लामच्या नजरेतूनच पाहायला हवे. असहिष्णू प्रवृत्तींशी संघर्ष केल्याशिवाय सहिष्णूता टिकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विवेक विचार मंच, भारत विकास परिषद, स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र आणि प्रवाह फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव पाटील यांनी केले.

अन्य लेख

संबंधित लेख