मुंबई : भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीममधील खेळाडूंचा सत्कार केला. महिला खेळाडूंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात विश्वविजेत्या संघातील खेळांडूचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली उगले, संघाच्या कर्णधार दीपिका टी.सी., उपकर्णधार व महाराष्ट्राची खेळाडू गंगा कदम, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडियाचे चेअरमन के. जी. महंतेश, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांच्यासह संघातील खेळाडू उपस्थित होते.
या खेळाडूंनी भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले असून तिरंग्याचा सन्मान वाढवला आहे, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. अंतिम सामन्यात निर्णायक विजय मिळवत भारतीय मुलींनी दृष्टिबाधित क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण असून इतिहासात दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेटचे पहिले चॅम्पियन म्हणून भारताचे नाव कोरले गेले आहे. इतिहासात या विजयाची नोंद होईल. या यशामागे खेळाडूंनी घेतलेले अपार कष्ट, सातत्यपूर्ण सराव आणि अनेक अडचणींवर मात करण्याची जिद्द आहे. प्रत्येक खेळाडूची स्वतःची संघर्षकथा असून प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता त्यांनी सराव सुरू ठेवला. “कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती” हे वाक्य या संघाने प्रत्यक्षात उतरवले आहे.
संघाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. तसेच खेळाडूंना सरावासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी मैदान व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत क्रीडा आयुक्तांमार्फत चर्चा करून योग्य कार्यवाही केली जाईल. कोणतीही आर्थिक किंवा कौटुंबिक अडचण खेळातील प्रगतीस अडथळा ठरू नये, यासाठी लागेल ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशात खेळ आणि खेळाडूंना मिळणारे महत्त्व वाढत आहे. पूर्वी खेळाला करिअर म्हणून कमी महत्त्व दिले जात होते; मात्र आता ही मानसिकता बदलत असल्याचे मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. गंगा कदम महाराष्ट्राची लेक असली, तरी येथे उपस्थित असलेल्या सर्व खेळाडू भारताच्या लेकी आहेत. त्यामुळे सर्व खेळाडूंना मदतीसाठी सहकार्य करू. या खेळाडूंनी देशाला अभिमान वाटेल असे काम केले आहे. पुढेही अशीच कामगिरी करत राहा; देश आणि राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटी सर्व खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.