Thursday, November 13, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

Share

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेन्ट’ या योजनेंतर्गत ९९ कोटी १४ लाख रुपये खर्चातून नाशिकमधील रामकुंड परिसरासाठी महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनावर भर

नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाचे संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेतली. २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे सांस्कृतिक महत्त्व जगभरात पोहोचविण्यासाठी शासनाने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

  • प्रकल्पाचे स्वरूप: ‘रामकाल पथ’ प्रकल्पांतर्गत रामकुंड मार्ग आणि परिसरातील संपूर्ण संरचनांचे संवर्धन, दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
  • महत्त्व: या प्रकल्पामुळे रामकुंड, सीता गुंफा, काळाराम मंदिर, राम लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व भाविकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल. देशभरातून गोदावरी नदीच्या किनारी येणाऱ्या भाविकांसाठी हा प्रकल्प आनंददायी अनुभव देणारा ठरेल.

या भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह स्थानिक आमदार ॲड. राहुल ढिकले, दिलीप बनकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे आदी उपस्थित होते. प्रशासकीय स्तरावर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘रामकाल पथ’ प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळाराम मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर विश्वस्तांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

अन्य लेख

संबंधित लेख