Friday, September 13, 2024

विश्व हिंदू परिषदेच्या श्रीरामोत्सवाला देशभर प्रारंभ

Share

दरवर्षी विश्व हिंदू परिषदेतर्फे वर्षप्रतिपदेपासून ते रामनवमी, हनुमान जयंतीपर्यंत श्रीरामोत्सव साजरा केला जातो. यंदाही या उत्सवाला देशात प्रारंभ झाला आहे. यंदा साजऱ्या होत असलेल्या श्रीरामोत्सवाची काही वैशिष्ट्ये.

प्रभू श्रीराम हे राष्ट्रीय पुरुष आणि आपल्या राष्ट्राचे मानबिंदू आहेत. श्रीराम आसेतुहिमाचल सर्वांना वंदनीय आहेत. प्रभू श्रीरामांचे चरित्र सर्वांसमोर यावे यासाठी श्रीरामोत्सवात अनेकविध कार्यक्रमांचे विश्व हिंदू परिषदेचे आयोजन केले जाते. रामोत्सवाच्या माध्यमातून सर्वदूर सकारात्मक उर्जा उत्पन्न व्हावी आणि तिचा संचय व्हावा, हाही हेतू या उत्सवामागे आहे. त्या दृष्टीने रामोत्सव हा ग्रामोत्सव व्हावा, असे प्रयत्न विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते करतात. राम चरित्राचे गुणगाण, रामगीतांचे गायन, रामकथा मांडताना राष्ट्रीय विचारांचा प्रचार-प्रसार, राम भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन शहरांमध्ये तसेच गावागावांमध्ये केले जाते.

प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्यानगरीत झाला. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम राम असेही म्हटले जाते. मर्यादापुरुषोत्तम राम म्हणजे सर्व क्षेत्रात रीतीनुसार मर्यादांचे पालन करीत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले ते श्रीराम. ते स्वतः राजा असूनसुद्धा आपल्या प्राणप्रिय भक्तांसाठी ते सदैव धावून गेले. आपले संपूर्ण आयुष्य रामाची वाट पाहणाऱ्या शबरीला दर्शन देण्यासाठी गेले. माझ्या रामाला आंबट बोरे दिली जाऊ नयेत म्हणून शबरी त्यांना उष्टी बोरे देत होती आणि रामही ती उष्टी बोरे आनंदाने खात होते. कपटाने सुग्रीवाचे राज्य व पत्नीचे अपहरण करणाऱ्या वालीचा वध करून आपल्या मित्राची मदत केली. वडिलांनी सावत्र आईला दिलेले वचन स्वतः १४ वर्षे वनवासात जाऊन पूर्ण केले. बलाढ्य रावणाला वानरसेनेसोबत मैत्री करून व त्यांची मदत घेऊन त्यांनी परास्त केले.

अशा अनेक गोष्टी रामोत्सवाच्या निमित्ताने समाजासमोर मांडल्या जाव्यात, तसेच अयोध्येत साकारलेले भव्य श्रीराम मंदिर, प्रभू श्रीरामांची मर्यादा पुरुषोत्तम म्हणून असलेली ओळख, समरसता, धर्मप्रसार, संघटन, कर्तव्याप्रतीची तीव्र भावना, मातृभूमीविषयीचे प्रेम, वनवासी बाधवांविषयीचे त्यांचे प्रेम अशा गोष्टी अधोरेखित करण्यासाठीही रामोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन चांगल्या पद्धतीने कार्यकर्ते करतात.

रामोत्सवातून हिंदूंचे राष्ट्रीय चरित्र निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातात आणि तशी भूमिका आग्रहाने मांडली जाते. यंदाच्या रामोत्सवाला देशात सुरुवात झाली असून यंदाही गावागावांध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

विवेक सोनक
(लेखक विश्व हिंदू परिषदेच्या मुंबई व गोवा राज्य या मुंबई क्षेत्राचे क्षेत्र प्रचार व प्रसार समन्वयक आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख