मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पेहरावावरून (लुंगी) सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी “जिनके खुद के घर शीशे के हों, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते,” अशा शब्दांत सुनावले आहे. विशेष म्हणजे, प्रत्युत्तर देताना चव्हाणांनी आदित्य ठाकरे यांचा ‘लुंगी’ परिधान केलेला जुना फोटो शेअर करून राऊतांची कोंडी केली आहे.
‘ती माझी वैयक्तिक बाब’
रवींद्र चव्हाण यांनी ‘X’ (ट्विटर) वर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, “निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे आणि गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केला आहे. मुळात ती माझी वैयक्तिक बाब आहे. आमच्यावर ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ असे विचारधारेचे संस्कार आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही जीभ उचलली तरी मी संयम राखून आहे आणि राहीन.”
आदित्य ठाकरेंचा फोटो आणि ‘मतांचे राजकारण’
संजय राऊत यांनी चव्हाणांच्या पेहरावावरून ‘अण्णा मलाई’ म्हणत खिल्ली उडवली होती. त्याला उत्तर देताना चव्हाण यांनी दक्षिण भारतीय वेशभूषेतील आदित्य ठाकरे यांचा फोटो शेअर केला. “ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल आणि विकासावर बोलण्यासारखं काही नसतं, तेच असली विधानं करतात. मतांसाठी लुंगी घालणाऱ्यांचा फोटो सोबत जोडला आहेच,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.

‘आरोग्याची काळजी घ्या’
वाद वाढवण्याऐवजी चव्हाणांनी राऊतांना उपरोधिक शुभेच्छाही दिल्या. “संजय राऊत यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा!” असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
नेमकं प्रकरण काय?
दादरच्या शिवतीर्थावर झालेल्या महायुतीच्या सभेत रवींद्र चव्हाण लुंगी परिधान करून आले होते. यावरून संजय राऊतांनी “रसमलाई इफेक्ट” अशी टीका करत, मराठी लेंगा का घातला नाही? असा सवाल केला होता. याला आता चव्हाणांनी पुराव्यानिशी आणि संयमी भाषेत उत्तर दिल्याने सोशल मीडियावर या ‘फोटो वॉर’ची मोठी चर्चा रंगली आहे.
केशव उपाध्ये यांचा प्रहार
संजय राऊत याच्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर देत राऊतांना आरसा दाखवला आहे, “संजय राऊतजी, हा तुमच्या आणि आमच्यातील संस्कृतीतील फरक आहे. तुमची तब्येत बिघडली होती तेव्हा पंतप्रधानांपासून सर्वांनी तुम्हाला लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या. मात्र तुम्ही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या गुडघेदुखीचं राजकारण करत आहात. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवारांसमोर गुडघे घासून ज्यांची वाटीच संपली आहे, त्यांना दुसऱ्याच्या वेदना काय कळणार?” अशा शब्दांत उपाध्ये यांनी राऊतांवर तीव्र टीका केली आहे.