Saturday, July 27, 2024

रझाकार : रक्तरंजित इतिहासाचे चित्रण

Share

तत्कालीन हैदराबाद संस्थानाला रक्तरंजित इतिहास आहे. या काळात रझाकारांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यांना मारून टाकले, महिलांवर बलात्कार केले, धर्मांतर केले, त्यांची संपत्ती, दागदागिने लुटले. या दुर्दैवी पर्वाचे चित्रण असणारा ‘रझाकार : द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद’ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताना देशाच्या संपत्तीवाटपाबद्दल जे विधान केले, त्याचे मूळ या इतिहासात आहे.

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण हैदराबाद हे संस्थान ब्रिटिशांच्याच अधिपत्याखाली होते. हैदराबादचा शेवटचा निजाम, मीर उस्मान अली खान याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होऊ नये, यासाठी कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली एक निमलष्करी दल स्थापन केले. त्यांना ‘रझाकार’ संबोधले जाते. या रझाकारांनी हिंदूंवर अतोनात अत्याचार केला, त्यांचे दागिने, संपत्ती लुटली, बळजबरीने धर्मांतरे केली. ‘लोकसभा २०२४’च्या प्रचारात राजस्थानच्या बांसवाडा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करून जी टीका केली, त्याचे मूळ या इतिहासात असावे. काँग्रेस सत्तेवर आल्यास तसे परत होण्याची साधार भीती त्यांनी बोलून दाखवली असावी. ‘देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. ही सगळी संपत्ती एकत्र करून, ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना ती वाटली जाईल. महिलांचे दागिने एकत्र करून ते त्यांना दिले जातील. तुमच्याकडे मंगळसूत्रही राहणार नाही. हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे,’ असे पंतप्रधानांनी प्रचाराच्या जाहीर सभांमध्ये बोलून दाखवले. महाराष्ट्रातही त्यांच्या विदर्भ, मराठवाड्यात (परभणी) आतापर्यंत सभा झाल्या आहेत.

Mir usman ali khan
मीर उस्मान अली खान

हैदराबादमधील या संघर्षाचे आणि दुर्दैवी इतिहासाचे चित्रण ‘रझाकार : द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद’ या चित्रपटात करण्यात आले आहे. हा चित्रपट शुक्रवारी (ता. २६ एप्रिल २०२४) प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन येता सत्यनारायण यांचे असून निर्मिती गुडूर नारायण रेड्डी यांची आहे. तेलगू, तमीळ, कन्नड, मल्याळम या दाक्षिणात्य भाषांबरोबरच आता हिंदीतही हा चित्रपट येणार आहे. यानिमित्त गुजराथमधील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ सर्व कलाकारांनी जमून या लोहपुरुषाला आदरांजली वाहिली. रझाकाराविरुद्धच्या या लढ्यात सरदार पटेल यांचे मोठे योगदान आहे.

Razakar unit
रझाकार दल

हैदराबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान याला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करायचे नव्हते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निजाम वंशाचे राज्य होते. त्याने कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली एक निमलष्करी दल स्थापन केले. ‘हिंदूच्या विरोधातील पद्धतशीर हिंसाचार’ हे या दलाचे उद्दिष्ट होते. या दलाला त्यावेळी ‘रझाकार’ असे संबोधले जात असे. हैदराबादच्या या रझाकार दलाने तेथील बहुसंख्याक हिंदूंवर अत्याचार करताना क्रौर्याची परिसीमा गाठली होती. या अत्याचाराची तुलना क्रूरकर्मा हिटलरच्या नाझी सैन्याने केलेल्या अत्याचाराबरोबर केली जाते. आजही मराठवाडा आणि तेलंगणात रझाकार या शब्दाकडेही तुच्छतेने बघितले जाते.

हैदराबादमध्ये मुस्लिम राजवट टिकवून ठेवण्यासाठी आणि भारतात विलीन होण्यास विरोध करण्यासाठी निजामाने कासिम रझवी याच्या नेतृत्वाखालील रझाकाराच्या निर्मितीला मंजुरी दिली. रझाकारांनी हिंदूंचा छळ करताना तेलंगणातील वीरा बैरनपल्ली या गावातील पुरुषांना गोळ्या घालून ठार मारले. हिंदू महिलांवर बलात्कार केले. त्यांचा जमीनजुमला, दागिने, सगळी संपत्ती लुटली. या दहशतीपासून वाचण्यासाठी अनेक गावकऱ्यांनी विहिरीत उड्या घेतल्या. अनेक मंदिरेही रझाकारांनी लुटली. १९४८ मधील ‘ऑपरेशन पोलो’द्वारे आपल्या सैन्याचा पराभव होईपर्यंत रझाकारांनी त्यांची हिंदूंवरील अत्याचारांची रानटी मोहीम सुरूच ठेवली होती. याला कंटाळून सर्वधर्मीय जनतेने भारतात विलीन होण्याची मागणी सुरू केली. रझाकरांनी अत्यंत क्रूरपणे आपल्या विरोधातील ही चळवळ मोडण्यास सुरुवात केली.

शेवटी स्वतंत्र भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजाम सरकारच्या विरोधात ‘पोलीस ऍक्शन’ची घोषणा केली. १८ सप्टेंबर १९४८ रोजी ‘ऑपरेशन पोलो’ अंतर्गत मेजर जनरल जे. एन. चौधरींच्या नेतृत्वाखाली, पाच दिशेने निजाम संस्थानावर कारवाई सुरू झाली. भारतीय फौजेपुढे रझाकार फार काळ टिकू शकले नाहीत आणि कासीम राजवीला अटक झाली. शेवटी २२ सप्टेंबर १९४८ रोजी निझाम सरकारने हार मानली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. कासिम रजवीला अटक करण्यात आली. ४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात जाईल, या अटीवर नंतर त्याला सोडण्यात आले.

अन्य लेख

संबंधित लेख