Wednesday, March 4, 2026

‘मुंबईच्या प्रदूषणाचे खरे धनी उद्धव ठाकरे!’ भाजप नेत्याचा ‘सामना’वर निशाणा; २५ वर्षांच्या सत्ताकाळातील अपयशावर थेट प्रश्न

Share

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वाढत्या वायू प्रदूषणावरून राजकारण तापले असून, भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर आणि त्यांच्या ‘सामना’ वृत्तपत्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. उपाध्ये यांनी प्रदूषणाच्या समस्येसाठी थेट उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेतील त्यांच्या २५ वर्षांच्या सत्तेला जबाबदार धरले आहे.

‘सामना’तून राजकीय प्रदूषणाचा विखार
केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे ‘सामना’ वर्तमानपत्रातून माध्यम क्षेत्रातही ‘प्रदूषित विखार’ पसरविला जात असल्याचा आरोप केला.

उपाध्ये म्हणाले: “मुंबईच्या प्रदूषणाचा फैलाव हवेबरोबरच राजकारणातही फोफावला आहे. हवेतील प्रदूषणावर प्रभावी उपाय होतीलच, त्याचबरोबर या निमित्ताने राजकीय प्रदुषणाचा फैलाव रोखण्याची जबाबदारीही देवेंद्रजी (फडणवीस) घेतील! सामना व्यतिरिक्त अन्य वर्तमानपत्रे वाचली तर प्रदूषणाबाबतचे प्रामाणिक वास्तव स्पष्ट होते.”

“ही समस्या कशी फोफावली?
या समस्येच्या अपयशाचे खरे धनी कोण?
उध्दव ठाकरे स्वतःचं अपयश किती वेळा लपवणार?

  • मुंबईच्या आजच्या स्थितीला उबाठा जबाबदार आहे हे कधी स्वीकारणार? गेल्या २५ वर्षात प्रदुषणमुक्तीसाठी त्यांनी काय केले?
  • दरवर्षी नोव्हेंबर पासून पुढचे तीन महिन्याचे हवामानाचे आकडे पहा… या कालावधीत मुंबईतील प्रदुषण वाढलेले असते.
  • ज्या मुंबईच्या प्रदूषणाबद्दल उद्धवरावांना आज चिंता वाटते ती चिंता महापालिकेत सत्ता असताना का केली नाही?
  • उद्धवराव, STP प्रकल्प आपण करू शकला नाहीत. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कामे सुरू झाली. तोवर घाण पाणी तसेच समुद्रात सोडले जायचे. या पापाचे धनी कोण ?
  • मेट्रो आरे कांजूरमार्गावरून पुन्हा फेकाफेकी सुरू करत आहात. मेट्रोला विरोध करत आरे कारशेड ला स्थगिती तुम्ही दिली, आणि प्रदुषण रोखण्याचा मार्ग बुजवलात!
  • मुंबईच्या मध्यावरून वाहणारी मिठी नदी ही एके काळी मुंबईचे वैभव होती. महापालिकेतील तुमच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराची गटारे या नदीत मोकळी केली, आणि तिचा गलिच्छ नाला करून टाकला… या गटारनिर्मितीची जबाबदारी तुम्ही घेणार का?” असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

भाजपने आता मुंबईच्या निवडणुकीत ‘प्रदूषण आणि भ्रष्टाचार’ या दोन प्रमुख मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे गटाला घेरण्याची रणनीती स्पष्ट केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख