Tuesday, January 13, 2026

चव्हाणांच्या आजारपणावरून राजकारण? राऊतांच्या टीकेला भाजपचे जळजळीत प्रत्युत्तर; नेमकं प्रकरण काय?

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच आता नेत्यांच्या पेहरावावरूनही राजकीय युद्ध पेटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महायुतीच्या सभेत परिधान केलेल्या दाक्षिणात्य पेहरावावरून (लुंगी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी टोलेबाजी केली. मात्र, या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर देत राऊतांना आरसा दाखवला आहे.

नेमका वाद काय? (संजय राऊत यांची टीका)
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे शिवतीर्थावरील महायुतीच्या सभेत दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून आले होते. यावर बोलताना संजय राऊत यांनी उपरोधिक टीका केली. राऊत म्हणाले की, “याला ‘रसमलाई इफेक्‍ट’ (अण्णा मलाई) म्हणायचे का? म्हणे गुडघ्याला मार लागलाय म्हणून लुंगी नेसली आहे; मग मोकळा ढाकला मराठी लेंगा घालता आला असता की! काय बोलायचे यांना?” अशा शब्दांत राऊतांनी चव्हाणांच्या पेहरावाची खिल्ली उडवली.

केशव उपाध्ये यांचे जोरदार प्रत्युत्तर
राऊतांच्या या टीकेचा समाचार घेताना केशव उपाध्ये यांनी संस्कृती आणि राजकीय नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला. उपाध्ये यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत राऊतांवर घणाघाती प्रहार केला:

संस्कृतीतील फरक

“संजय राऊतजी, हा तुमच्या-आमच्या संस्कृतीतील फरक आहे. तुमची तब्येत बिघडली होती, तेव्हा पंतप्रधानांपासून सर्वांनी तुम्हाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पण तुम्ही मात्र रविंद्र चव्हाणांच्या गुडघेदुखीचे राजकारण करत आहात.”

‘गुडघे घासण्या’वरून टोला

“सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवारांसमोर गुडघे घासून ज्यांची वाटीच संपली आहे, त्यांना दुसऱ्याच्या शारीरिक वेदना काय कळणार?” अशा बोचऱ्या शब्दांत उपाध्यांनी राऊतांना सुनावले.

रविंद्र चव्हाण यांनी वैद्यकीय कारणास्तव (गुडघ्याच्या दुखापतीमुळे) हा पेहराव केल्याचे स्पष्टीकरण दिले असतानाही, विरोधकांनी त्याला राजकीय वळण दिले आहे. भाजपच्या मते, विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे ते आता नेत्यांच्या वैयक्तिक पेहरावावर आणि आजारपणावर टीका करत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख