Sunday, May 26, 2024

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यशस्वी की अयशस्वी?

Share

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला. रणदीप हुडा यांची निर्मिती, दिग्दर्शन, प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र, विशिष्ट वर्गाकडून त्याविरोधात लिहिले जाऊ लागले, चित्रपटाचे यश ‘गल्ल्या’त मोजले जाऊ लागले. खरेच असे यश पैशात मोजता येते? विशेषतः चित्रपट जेव्हा ‘वीर सावरकर’ या व्यक्तीच्या जीवनकार्यावर आधारित असतो; विविध मुद्द्यांवर केलेला ऊहापोह.

मराठी आणि हिंदीमध्ये निर्माण झालेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. त्याचे चांगले स्वागत झाले. महाराष्ट्रात अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे आणि त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. मात्र, काही समाज माध्यमी मंडळी याचे यश पैशात मोजत आहेत. दर दिवसाआड त्यांच्या वेबपेजवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ची आज इतकी कमाई’ अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ही वृत्ती खटकणारी आहे. प्रत्येक गोष्ट पैशात तोलता येत नाही, हे या लोकांना कळतच नाही.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव मराठी माणसाच्या घराघरांत आदराने घेतले जाते. राजकारणातील कमालीच्या व्यक्तीद्वेषामुळे अलीकडच्या काळात या परिस्थितीत काही प्रमाणात बदल झाला असला, तरी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद अजूनही मिळत आहे.

प्रामुख्याने तरुण-युवकांचा प्रतिसाद भरघोस आहे. चित्रपटगृहात ‘वंदे मातरम्’चे नारे गुंजत आहेत. ‘भारत माता की जय’ असा जयघोष दणदणत आहे. ‘वीर सावरकर की जय’ असा नारा दिला जात आहे. चित्रपटगृह अक्षरशः भारावून जात आहे. प्रेक्षकांबद्दल बोलायचे, तर एकट्या-दुकट्या प्रेक्षकांबरोबर ग्रुपमध्ये येणारे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ज्यांना चित्रपट बघण्याची इच्छा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत, अशांसाठी – अशा गटांसाठी चित्रपटाचे खास खेळ आयोजित केले जात आहेत.

ज्यांनी अद्याप चित्रपट बघितलेला नाही, त्यातील काहींचे म्हणणे असे आहे, की सावरकरांवरचे अत्याचार आम्हाला बघवणार नाहीत. त्यामुळे चित्रपट बघण्याचे आम्ही टाळले आहे. एकाने तर फेसबुकवर म्हटले आहे, “रणदीप हुडाने चित्रपटासाठी स्वतःचे घर विकले आहे. त्याच्याबरोबर भेट झाली, तर आमच्या क्षमतेप्रमाणे आम्ही त्याला आर्थिक मदत करू इच्छितो.”

या भावनांचे मोल पैशात कसे करता येईल?

हिंदी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुडा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन, सहलेखन त्यांचेच आहे. स्वातंत्र्यवीरांची भूमिकाही त्यांनीच केली आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल ३३ किलो वजन घटवले. केस कापून टाकले. ध्यास घेऊन त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांनी हरियानामधले आपले घरदेखील विकले. त्यांच्या वडिलांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले. दोन-अडीच वर्षांपासून ते या निर्मितीसाठी काम करत आहेत. ते म्हणतात, “मैनें एक गुस्सेमें ये फिल्म बनाई है. सावरकरजीपर हुए अन्याय को ठीक करने के लिए बनाई है. इसमें मेरी किसीने मदद नही की, मेरा घर बेचके मैंने ये फिल्म बनाई है.”

विशिष्ट (इथे सावरकर) व्यक्तीवर हा चित्रपट आहे आणि एखाद्या कलाकाराने प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत हा चित्रपट पूर्ण केला म्हणून चित्रपटाचे कौतुकच करावे असे अजिबात नाही. पण याच कारणामुळे त्या चित्रपटाला सतत धारेवर धरावे, ‘प्रोपगंडा फिल्म’ म्हणून तिचा उद्धार करावा, त्याचे यश केवळ पैशात मोजावे हेदेखील बरोबर नाही ना! कोणत्याही कलाकृतीचे मोजमाप तिच्या गुणवत्तेवरच व्हायला हवे. कलागुणांवरच व्हायला हवे. तिथे पैशाचा प्रश्न येतो कुठे? व्यवसाय महत्त्वाचा हे बरोबर, पण काही गोष्टी त्या पलीकडेही असतात. हा चित्रपट तसा आहे.

एखाद्या चित्रपटाने इतका गल्ला जमवला असे सांगून कोटी कोटींचे आकडे आपल्या माथी मारले जातात. हल्ली तो ट्रेंडच आहे. अशा गल्लाभरू चित्रपटांचे ठीक आहे, त्यांना सगळे पैशातच दिसते. पैशातच मोजता येते. पण ‘सावरकर’ चित्रपटाची जातकुळीच वेगळी आहे, हे लक्षात घ्यायला नको का? त्याचे यश तुम्ही पैशात कसे मोजणार? एकवेळ चित्रपट-निर्मितीचा खर्च आकड्यात काढता येऊ शकेल. पण चित्रपटासाठी घेतलेली मेहेनत, संशोधन, ध्यास याची किंमत कशी करणार?

कलाकारांचे मौन

सावरकर हे मराठी, पण त्यांच्यावरील चित्रपट एका अमराठी – हरियाणवी माणसाने काढला. त्यासाठी त्याने १८९७ ते १९५२ हा कालखंड निवडला. या कालखंडात घडलेल्या बारीक न् बारीक गोष्टीचा त्याने अभ्यास केला आणि आपल्या चित्रपटात त्या मांडण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षक म्हणून तो आपल्याला आवडेल किंवा आवडणारही नाही. आवडला नाही, तरी ते तर्कशुद्ध पद्धतीने सांगायला हवे. केवळ विरोधासाठी विरोध नको. पण एखाद्या शरद पोंक्षे यांच्यासारख्या अभिनेत्याचा अपवाद वगळता क्वचितच कोण्या मराठी कलावंताने या चित्रपटावर चांगली किंवा वाईट प्रतिक्रिया दिली आहे. शरद पोंक्षे त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर म्हणतात, “८३ वर्षांचं आयुष्य तीन तासात दाखवायचं अत्यंत अवघड, पण हुडा यांनी ते छान दाखवलंय. विशेषतः अंदमान पर्व, त्यात केलेले दयेचे अर्ज या सर्व गोष्टी पाहणाऱ्याच्या नीट लक्षात येतील व गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल.” कलाकाराने व्यक्त व्हायला हवे. एरवी तो कलाकृतींमध्ये कोणतीतरी ‘भूमिका’ वठवत असतो. पण प्रत्यक्षात व्यक्त होण्याने तो किंवा ती कसे विचार करतात, ते कळते. त्याचाही प्रेक्षकांवर परिणाम होत असतो आणि तो आवश्यक असतो.

मात्र, समाजातील काही मान्यवरांनी आवर्जून या चित्रपटावर मत व्यक्त केले आहे. त्यापैकी एक म्हणजे समाज माध्यमावर अत्यंत प्रभावीपणे आशयसंपन्न लेखन सतत करणाऱ्या शेफाली वैद्य. त्यांनी चित्रपटावर तर लिहिलेच, पण विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी ‘स्पेशल स्क्रीनिंग’चे आयोजन करण्यासाठीही पुढाकार घेतला. त्याला प्रतिसाद म्हणून अनेकांनी आपापल्या भागात असे विशेष खेळ आयोजित केले. हा खूप चांगला, सकारात्मक प्रतिसाद आहे.

आणखी विशेष म्हणजे, शेफालीताईंचा लेख वाचून त्यांना पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा फोन आला. लेख अतिशय आवडल्याचे पंडितजींनी सांगितले. मंगेशकर कुटुंबाचे सावरकर प्रेम सगळ्यांना ठाऊकच आहे. या सगळ्या भावंडांनी मिळून सावरकरांचे ‘ने मजसी ने’ हे गीत गायिले आहे. त्याविषयीचे सुंदर विवेचन असलेला एक कार्यक्रम दूरदर्शनचे तत्कालीन निर्माते अरुण काकतकर यांनी अनेक वर्षांपूर्वी सादर केला होता. त्यात लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांचा सहभाग होता. वैद्यसरांनी ही कविता अतिशय सुरेख रीतीने त्यावेळी उलगडून दाखवली होती. कवितेत दडलेले गर्भित अर्थ सांगितले होते. हा कार्यक्रम युट्यूबवर बघायला मिळतो.

सावरकर म्हटले, की असा विषय रंगत जातो. चित्रपटही असाच प्रेक्षकांना आवडतो आहे. चित्रपटाचे यश खरे तर हेच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, त्यांचे जीवनकार्य, त्यांचे दशप्रेम, त्यांनी केलेला त्याग याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. तरीही कोणी ते पैशात मोजण्याचा प्रयत्न केलाच, तर तसे करणाऱ्याचीच ‘किंमत’ होईल.

ऋता बावडेकर

लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख