मुंबई : आपल्या पहाडी आवाजाने आणि ठसकेबाज गायकीने लावणीला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत “सोळावं वरीस धोक्याचं” या विशेष स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुलोचना चव्हाण यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक लोकप्रिय आणि अजरामर लावण्या गायल्या आहेत. या कार्यक्रमात त्यांच्या याच लोकप्रिय रचनांचे सादरीकरण करून त्यांच्या समृद्ध संगीत वारशाला स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. लावणीच्या ठेक्यांमधून आणि सुरेल गायकीतून त्यांचा संपूर्ण कलात्मक प्रवास रसिकांसमोर पुन्हा एकदा जिवंत केला जाणार आहे.
हा सांस्कृतिक सोहळा शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता, मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे पार पडणार आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कला आणि कलाकारांच्या वारशाचे जतन करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. सुलोचना चव्हाण यांची गायकी ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या स्वरोत्सवाच्या निमित्ताने नवीन पिढीलाही त्यांच्या कलात्मक उंचीचा अनुभव घेता येणार आहे.
विलेपार्ले येथील रसिकांसाठी ही एक अनमोल साहित्यिक आणि सांगीतिक मेजवानी ठरणार आहे.