अनाथ मुलांसाठी वैयक्तिक स्तरावर आगळे-वेगळे काम करणाऱ्या सेवाभावी गृहिणी अशी सुषमा गोडबोले यांची ओळख आहे. अनाथ मुलांना दरवर्षी नवीन कपडे शिवून देण्याच्या त्यांचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असाच. एका छंदातून सुरू झालेल्या त्यांच्या या उपक्रमाची ओळख अनेकांना निश्चितच प्रेरणा देईल.
जीवन जगताना प्रत्येक माणूस काही ना काही छंद जोपासतो. आपले मन रमवण्यासाठी माणसाला छंद आवश्यकही असतो. पण, या छंदाचे रूपांतर सामाजिक कार्यात करण्याची किमया पुण्यातील सुषमा गोडबोले यांनी साधली आहे. शिवणकामाच्या छंदातून गरजू आणि अनाथ मुला-मुलींसाठी नवीन कपडे शिवून ते त्यांना देण्याचे काम त्या गेली १८ वर्षे करीत आहेत. हे नवीन कपडे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या अभिनव उपक्रमाची यंदा दीड तपपूर्ती झाली आहे. सलग १८ वर्षे त्या हे असिधारा व्रत निभावत आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांनी आपल्यातील ही सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे.

सुषमा गोडबोले यांनी विविध वयोगटातील मुला-मुलींसाठी शिवलेल्या सुमारे पाचशे नव्या कपड्यांनी भरलेले बॉक्स यंदा दसऱ्यापूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रदीप कुंटे यांच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. पुणे परिसरातील गरजू आणि अनाथ मुलांना हे कपडे वितरित करण्यात येणार आहेत.
सुवासिक तेल, सुगंधी उटणे लावून परिधान केलेले नवे कपडे, कुटुंबियांसमवेत फराळ आणि गोडधोड पदार्थांचे भोजन करून सारेच दिवाळीचा आनंद लुटतात. पण, अनेक मुलांच्या नशिबी हे भाग्य नसते. अशा अनाथ आणि गरजू मुलांसाठी नवे कपडे शिवण्याचे काम सुषमा गोडबोले गेल्या १८ वर्षांपासून करत आहेत.
‘आपण सणाला नवीन कपडे परिधान करतो. मग गरजूंना नवीन कपडे का देऊ नयेत, असा विचार मला सुचला. पहिल्या वर्षीच्या दिवाळीला मी नवीन कपडे शिवून स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द केले. अनाथ मुलांना दिवाळीमध्ये नवे कपडे परिधान करता यावेत म्हणून मी स्वतः शिवलेले कपडे एका स्वयंसेवी संस्थेला दिले. नवे कपडे परिधान केलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर झळकलेल्या आनंदाने माझी दिवाळी गोड झाली’, अशा शब्दांत सुषमा गोडबोले यांनी या उपक्रमाचा ‘श्रीगणेशा’ कसा झाला याविषयी माहिती दिली.

‘हुजूरपागा प्रशालेत घेतलेले शिवणकामाचे शिक्षण असे उपयोगी पडेल, असे त्यावेळी कोणी सांगितले असते तर त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. विवाहानंतर मुलींचे कपडे शिवण्यापुरतीच माझी कला होती. मात्र, या कलेला आता वेगळे परिमाण लाभले याचे समाधान वाटते’, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली. ‘मी शिवलेले नवे कपडे स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द केल्यानंतर मी दोन महिने सुटी घेते. त्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक जानेवारी रोजी त्यावर्षीच्या दिवाळीच्या कामाचा श्रीगणेशा करते. त्यामुळेच मला पुरेसा कालावधी मिळतो’, अशी माहिती त्या देतात.

लहान मुलांचे काम म्हणजे देवाचे काम असते, अशी शिकवण आईने दिली. पती विजय गोडबोले यांची बदली गुजरातमधील बलसाड येथे झाली. तेथे वास्तव्यास असताना एकदा वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस आला होता. अशा पावसात फुगे विक्रीतून उपजीविका करणाऱ्या महिलेने आपल्या बाळाला जुन्या टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवले होते. त्या फाटक्या आणि तोकड्या टॉवेलमध्ये असलेले बाळ थंडीने कुडकुडत होते. त्यावेळी अशा गरजूंना नवीन कपडे शिवून दिले तर हा विचार माझ्या मनात आला आणि लगेचच त्याची अंमलबजावणी करून त्या बाळासाठी मी नवीन कपडे शिवून दिले. ही माझ्या छोट्या कामाची सुरुवात झाली खरी. आता त्यामध्ये माझ्या मुली, नातलग, मैत्रिणी आणि अनेक हितचिंतक सक्रिय सहभाग घेत असल्याने या उपक्रमाची व्याप्ती वाढली याचा आनंद आहे. आपल्या छोट्या कामातून अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद मला समाधान देणारे आहे, असे सुषमा गोडबोले सांगतात.
– जयश्री कुलकर्णी
(लेखिका सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांच्या अभ्यासक आहेत.)