Tuesday, December 3, 2024

योजनांच्या माध्यमातून महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

नांदेड : राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) देशभरात सुपरहिट झाली. या योजनेसह इतर योजनांमधूनही महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा, हेच शासनाचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. या योजनेसह शासनाच्या सर्व योजना ‘पर्मनंट’ सुरू राहतील, असा विश्वासही त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींसमोर व्यक्त केला. ते, नांदेड (Nanded) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात बोलत होते. लाडक्या बहिणींचे स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील दहा लाख भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ मिळतो आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन सुरु केलेली ही योजना आहे. आता महिनाभरात भाऊबीज पण येईल. आमची भगिनींसाठी ही ओवाळणी थांबणार नाही. ती सतत सुरूच राहीन. योजना सुरु होऊन तीन महिने झालेत, जवळपास २ कोटी ३० लाख भगिनींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या योजनेसाठी शासनाने ३३ हजार कोटींची तरतूद केली आहे. तर १७ हजार कोटी रूपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२४ या दोन महिन्यांचे आगाऊ हप्तेही खात्यात जमा केले आहेत. सध्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रूपये जमा होताहेत. तर यापुढे यामध्ये योजनेच्या रक्कमेत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे प्रत्येक महिलेला अधिक आर्थिक सक्षम बनविण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. छोटा, मोठा व्यवसाय उभारणीसाठी या रकमेचा पाठिंबा महिलांना मिळणार आहे. काही महिला या दिशेने पुढेही जात आहेत, त्याचे समाधान आहे. या महिला लखपती दिदी झाल्याचे पाहायचे आहे, असा आशावादही मुख्यमंत्री यांनी व्यक्त करत महिलांना प्रेरित केले. आर्थिक सक्षम महिला या ध्येयाबरोबरच सुरक्षित महिला यालाही शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटात ५० टक्के सवलतीचा लाभही देण्यात येत आहे. या योजनांबरोबरच सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आदी योजनाही सुरूच राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. गान सम्राज्ञी आशाताई भोसले यांनीही या योजनेचे कौतुक करत सरकारचे अभिनंदन केले आहे, हे विशेष. सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत ‘शासन आपल्या दारी’ सारखा स्तुत्य उपक्रम राबवून पाच कोटी जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, डॉ. तुषार राठोड, श्यामसुंदर शिंदे, राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनाच्यवतीने मुख्यमंत्री शिंदे यांचे स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.

अन्य लेख

संबंधित लेख