पुणे : पुणे विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन पोलीस स्थानके येतात व पुण्यात विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येथील विमानतळावर उतरतात. विमानतळापासून बाहेर पडण्यासाठी येथील सर्व सुरक्षितता आणि रस्त्यांच्या नियोजनाची जबाबदारी विमानतळ पोलिस यांच्या कडे असते. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचे मार्गदर्शन करण्यासाठी पोलिसांना नेहमी या परिसराच्या नकाशाची आवश्यकता असते.
त्याचप्रमाणे या पोलीस स्थानकाच्या हद्दीत जर एखादा गुन्हा घडला किंवा एखादी दुर्घटना घडली तर त्यावेळी तातडीने त्या ठिकाणी पोहोचण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांना या नकाशाच्या आधारे आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शक करून मार्गदर्शन करून तातडीने पाठवणे सोपे जाते. बरेचदा काही आंदोलने किंवा सार्वजनिक कार्यक्रम यांच्या निमित्ताने मोठा जमाव जमणार असल्यास त्या ठिकाणच्या बंदोबस्ताकरिता किंवा तेथील मिरवणुका वगैरे निघणार असतील तर त्यांचा मार्ग निश्चित करण्याकरिता पोलीस स्थानकात नकाशाची आवश्यकता भासते. सर्वांना सहज समजेल व आवश्यक त्या जवळच्या खुणांसह तसेच सॅटॅलाइट च्या माध्यमातून उपलब्ध गुगल मॅप चा वापर करून तंतोतंत मापात असणारे रस्ते व ठिकाणे निश्चित करून नकाशा तयार करणे आवश्यक असते.
पुण्यातील विमान नगर भागात असणाऱ्या सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या कामी पुढाकार घेत, आपले डिझाईनचे कौशल्य वापरून एक उत्तम नकाशा तयार केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निमित्ताने पोलिसांवर खूप मोठा ताण होता व या कालावधीमध्ये या नकाशाचा पोलीस यंत्रणेला खूपच उपयोग झाला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल विमानतळ पोलीस स्टेशनच्या वतीने सिंबायोसिस चे विद्यार्थी कौस्तुभ शर्मा आणि प्रियमव्रत देसाई यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या नकाशाकरिता विद्यार्थ्यांना संस्थेतील ग्राफिक डिझाईन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मनोहर देसाई यांनी मार्गदर्शन केले. विमानतळ पोलिस स्टेशनचे सीनियर पोलीस इन्स्पेक्टर आनंदराव खोबरे यांनी हा नकाशा कशाप्रकारे स्थानकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता उपयुक्त आहे याची माहिती दिली. या योगदानाबद्दल त्यांनी सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन व संस्थेच्या संचालिका संजीवनी आयाचित यांचे सुद्धा आभार मानले. विमानतळ पोलीस स्टेशन येथे झालेल्या या औपचारिक सोहळ्याला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व विमानतळ पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नकाशा तयार करण्याची संधी हा एक वेगळा अनुभव असल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. विविध ठिकाणी तसेच पोलिसांना हवे तसे बारकावे नोंदवून घेत तब्बल एक महिन्याहून अधिक काळ विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत करत हा नकाशा तयार केला. आपल्या कौशल्याचा वापर अशा प्रकारे देश सेवा करणाऱ्या पोलीस यंत्रणे करिता झाला याबाबत विद्यार्थ्यांनी विशेष आनंद व्यक्त केला व विमानतळ पोलीस स्टेशन व मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या प्राध्यापकांचे विशेष आभार मानले.
- एकनाथ शिंदेंची प्रकृती खालावली; ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू
- भाजप नेते गिरीश महाजन यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट; युतीतील स्थिती स्पष्ट केली
- उपमुख्यमंत्री होणार का? श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं
- महाराष्ट्रातील भाजप पक्षनेत्याची निवड; विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त
- शरद पवारांच्या गटातील अस्थिरता; अजित पवारांच्या गटात इनकमिंग वाढते!