महाराष्ट्र शासनाने तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि मातृभाषेतील गीतांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे. “महाराष्ट्र भूषण” आणि इतर राज्य सन्मानांप्रमाणेच यंदापासून सांस्कृतिक कार्य विभागातर्फे “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार अशा गीताला दिला जाणार आहे, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला, इतिहासाला आणि राष्ट्रभावनेला चालना देणारे असेल.
महाराष्ट्र शासनाने तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि मातृभाषेतील गीतांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे. “महाराष्ट्र भूषण” आणि इतर राज्य सन्मानांप्रमाणेच यंदापासून सांस्कृतिक कार्य विभागातर्फे “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार अशा गीताला दिला जाणार आहे, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला, इतिहासाला आणि राष्ट्रभावनेला चालना देणारे असेल.
याच त्यांच्या कवितेच्या संग्रहातून सावरकरांच्या “आत्मबल” या कवितेला सन्मानित करण्यात आले आहे.
सावरकरांच्या प्रत्येक कवितेमधून त्यांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान आणि संघर्षशील वृत्ती दिसून येतो. विशेषतः “सागरा प्राण तळमळला…” ही कविता त्यांच्या मातृभूमीवरील प्रेमाची जाणीव करून देते, तर ‘आत्मबल’ ही त्यांची विजिगीषु वृत्ती आणि आत्मविश्वास प्रकट करणारी कविता आहे.
“अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला।
मारिल रिपु जागती असा कवण जन्मला?”
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर – पु.ल. देशपांडे
Anadi Mi Anant Mi [Album: Swatantrate Bhagwati]
ही कविता संकटांचा धैर्याने सामना करण्याची प्रेरणा देते. तिच्या प्रत्येक ओळीत विजिगीषु वृत्ती आणि अदम्य आत्मविश्वास दिसून येतो.ही कविता इंग्रजांच्या छळासमोरही न डगमगता संघर्ष करणाऱ्या सावरकरांची मानसिकता स्पष्ट करते.
१३ मार्च १९१० रोजी ब्रिटिश पोलिसांनी लंडनमध्ये सावरकरांना अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला इंग्लंडऐवजी भारतात चालवला जाणार होता. त्यामुळे १ जुलै १९१० रोजी त्यांना ‘एस.एस. मोरिया’ या बोटीने भारताकडे रवाना करण्यात आले.
८ जुलै १९१० रोजी ही बोट फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात पोहोचली असताना, सावरकरांनी पोर्टहोलमधून समुद्रात उडी मारून पलायनाचा धाडसी प्रयत्न केला. एका अज्ञात जागी २० फूट उंचीवरून समुद्रात उडी घेणे म्हणजेच मृत्यूला सामोरे जाणे होते. प्रवाळांनी शरीराला इजा होण्याची भीती, खडकांवर आपटून मृत्यूची शक्यता… पण तरीही मातृभूमीच्या मुक्तीसाठी सावरकरांनी स्वतःला त्या समुद्रात झोकून दिले.
६० यार्ड पोहत मार्सेलिसचा किनारा गाठल्यानंतरही दुर्दैवाने ते पुन्हा पकडले गेले. इंग्रजांकडून अमानुष छळ होणार, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्या संकटसमयी आत्मबळ वाढवण्यासाठी स्फुरलेली कविता म्हणजेच “अनादि मी, अनंत मी…”
पूर्ण कविता अशी आहे,
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला |
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ||ध्रु||
अट्टहास करित जाई धर्मधारणी
मृत्युसीच गाठ घालू मी घुसे रणी
अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो
भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो
खुळा रिपु तया स्वये
मृत्युच्याच भीतीने भिववु मजसी ये ||१||
लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी
हटुनी भवति रचिल शीत सुप्रभावती
आण तुझ्या तोफाना क्रूर सैन्य ते
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाऽ हलाऽ त्रिनेत्र तो
मी तुम्हासी तैसाची गिळुनी जिरवितो ||२||
सावरकरांनी हे गीत संघर्षाच्या क्षणी स्वतःला उभारी देण्यासाठी रचले होते. कोणत्याही संकटाने आपले अस्तित्व संपवू शकत नाही, आपण कायमच टिकून राहणार आहोत, असा आत्मविश्वास या गीतात आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी देश आणि धर्मासाठी बलिदान दिले, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा न करता ब्रिटिश सरकारविरोधात लढा दिला. या लढ्यात, मार्सेलिसमध्ये त्यांनी स्वतःला उभारी देण्यासाठी रचलेल्या गीताचा सन्मान हा देशभक्तीचा अभिमान आहे.
“छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” हा सावरकरांच्या प्रेरणादायी गीताला दिला जाणारा हा मान राष्ट्रभक्तीची ज्योत नव्या पिढीत तेवत ठेवेल.