Thursday, December 4, 2025

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण..,

Share

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या जनसंवाद मोहिमेला मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेदरम्यान नागरिकांनी महायुती सरकारच्या मेट्रो, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांविषयी समाधान व्यक्त केले, परंतु महापालिकेतील भ्रष्टाचारावर तीव्र संताप व्यक्त केला असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम (Ameet Satam)यांनी सांगितले.

मोहिमेला मिळालेला प्रतिसाद

भाजपचा जाहीरनामा (संकल्पपत्र) तयार करण्यासाठी पक्षाने डबेवाले, हमाल, रिक्षाचालक, युवक, व्यावसायिक आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांशी संवाद साधून सूचना गोळा केल्या. १६ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत एकूण २,६५,७३८ लोकांनी सहभाग घेऊन आपली मते नोंदवली. भविष्यातील मुंबईसाठी १,४५,६१६ लोकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे, जे मोहिमेचे मोठे यश असल्याचे साटम यांनी सांगितले.

मोहिमेत सहभागी झालेल्या जवळपास ५३ टक्के नागरिकांनी महापालिका सेवांच्या गुणवत्तेवर असमाधान व्यक्त केले. 18 वर्षाखालील 2%, 18–30 वयोगटातील 25%, 30–60 वयोगटातील 65%, तर 60 वर्षावरील 8% नागरिकांनी आपले मत नोंदवले. त्यांच्या तीन प्रमुख अपेक्षा खालीलप्रमाणे आहेत. भ्रष्टाचारमुक्त शासन, प्रामाणिकपणा आणि लोकांशी अधिक संवाद. रस्ते, पाणी, आरोग्य, गृहनिर्माण व पुनर्वसन, आणि शिक्षण या पाच बाबी सर्वात मोठ्या समस्या म्हणून नागरिकांनी नमूद केल्या. त्यांना विशेषतः रस्ते व खड्डे, कचरा संकलन व स्वच्छता, आणि नालेसफाई व पुरनियंत्रण या तीन क्षेत्रांत त्वरित सुधारणा हव्या आहेत, असे साटम यांनी सांगितले.

रचनात्मक सूचनांचा समावेश

मुंबईकरांनी शहराचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक रचनात्मक सूचना दिल्या आहेत. यामध्ये स्थानिक पातळीवर स्वच्छता स्पर्धा, नियोजित हॉकर झोन तयार करणे, सार्वजनिक रुग्णालयांत महिला व ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड, इनोव्हेशन हब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा डिजिटल अनुभव देण्यासाठी ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) बूथ्स उभारणे यांसारख्या सूचनांचा समावेश आहे. तसेच, सर्व नागरिक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असलेले संकेतस्थळ तयार करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

भाजप लवकरच या सूचनांचा समावेश असलेला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे.

यावेळी, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम म्हणाले कि, “आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यंदा मुंबई महानगर पालिकेवर भाजपा महायुतीचा भगवा फडकणार हा विश्वास पक्का झाला आहे.” या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक मुंबईकराचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जनतेने दिलेला हा उत्स्फूर्त सहभागच आगामी निवडणुकीतील महायुतीच्या विजयाचा स्पष्ट संकेत आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख