Wednesday, November 25, 2026

भैरवी इतक्यात कशाला?

Share

लोणावळा-खंडाळा संगीत महोत्सवाची अविस्मरणीय स्वरयात्रा


इन्ट्रो: अभिजात म्युझिक फोरमतर्फे लोणावळ्यातील महाराजा अग्रसेन पॅलेस येथे पार पडलेला यंदाचा निवासी संगीत महोत्सव रसिकांसाठी सुरांची अखंड मेजवानी ठरला. दिग्गज कलावंतांचे सादरीकरण, अनवट राग, गुरू-शिष्य परंपरा आणि भोजनाची लज्जत यांचा हा हृदयस्पर्शी अनुभव रसिक संकेत शेखर कुलकर्णी यांनी आपल्या खास शैलीत शब्दबद्ध केला आहे.

पंडित राम देशपांडे आणि गंधार देशपांडे यांचे सहगायन अंतिम टप्प्यात आले आणि भैरवीचा सूर आळवला गेला. मी उगाचच मैफलीतून उठलो, बाहेर आलो आणि गॅलरीत उन्हात उभा राहिलो. अशी अवस्था का आली असेल? तीन दिवसांचा कार्यक्रम इतक्यात संपू नये, एवढेच त्यामागचे खरे कारण होते. काही कलाकार कधी एकदा भैरवी गातात आणि आपण घरी जातो असे होते, तर काही कलाकारांची भैरवी इतक्या लवकर सुरू होऊ नये असे वाटते. इथे तर सगळेच एकाहून एक मातब्बर होते! हा प्रसंग लोणावळा-खंडाळा संगीत महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी घडला. त्याआधीचे तीन दिवस कसे गेले, ते सांगायला हवे…

‘अभिजात म्युझिक फोरम’ ही केवळ एक संस्था नाही, तर एक कुटुंब आहे. गेली अकरा वर्षे सातत्याने अभिजात संगीत जपण्याचा वसा एखाद्या संस्थेने चालवावा, आणि तोही अशा काळात, ज्या काळात पाण्यात पीठ कालवून त्याला अस्सल दूध समजणारा मोठा वर्ग जन्माला आलेला आहे, हे खरं म्हणजे आश्चर्यजनक आहे, अद्भुत आहे आणि म्हणूनच प्रशंसनीय आहे. सलग तीन वर्षे मी या महोत्सवात सहभागी होतो आहे, निव्वळ एक रसिक म्हणून. पण हे नाते आता अधिक वृद्धिंगत झाले आहे. त्यामुळे आता मला ओढ लागते ती हा महोत्सव कधी होतोय याची. यंदा तारखा जाहीर झाल्यावर लगेचच बुकिंग करून मी व माझे काही निवडक साथीदार मोकळे झालो. निवडक याचसाठी, की अशा महोत्सवांना हजेरी लावण्याची आणि तो आनंद लुटण्याची ललाटरेषा माथी असावी लागते. मुख्य म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते; अन्यथा ते घडत नाही. पैसे खूप जणांकडे असतात. पण अभिजात संगीताचा अथवा साहित्याचा आस्वाद ज्याला घेता येतो तो भाग्यवान, असे माझे प्रामाणिक मत आहे.

‘साहित्यसङ्गीतकलाविहीनः’ आणि नव्या वास्तूतील स्वरोत्सव
भर्तृहरीने त्याच्या एका सुभाषितात म्हटले आहे, ‘साहित्यसङ्गीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः।’ साहित्य, संगीत आणि कलेशिवाय माणसाचे जगणे किती अपुरे आहे, हे सांगताना त्याने शब्दांची काहीच कसर ठेवलेली नाही. आता प्रत्येकाने उत्तम गायलेच, वाजवलेच किंवा लिहिलेच पाहिजे असे थोडेच आहे? सगळ्यांना ते जमेलही असे नाही. पण चांगले गाणे ऐकून आनंद घेता आला, एखाद्या कलाकृतीसमोर मन थांबले, तरी जगणे सार्थकी लागल्यासारखे वाटते. देवाने ऐकायला कान दिले आहेत; त्यांचा असा उपयोग करता आला पाहिजे! या तीन दिवसांत इथे जमलेली मंडळी गाणे नुसते ऐकत नव्हती, ते जगत होती आणि मनात जपत होती. गाण्याचे व्याकरण नाही कळले तरीही चालेल, पण अभिजात संगीताचा आनंद घेता आला पाहिजे. तो आनंद याच महोत्सवात मिळतो म्हणूनच रसिक आणि अभिजात म्युझिक फोरम यांच्या रेशीमगाठी बांधलेल्या आहेत.
आत्तापर्यंत हा महोत्सव मनःशक्ती केंद्रात होत होता. मात्र यंदा तो ‘महाराजा अग्रसेन पॅलेस’ या देखण्या वास्तूत होणार असल्याचे जाहीर झाले. एखादी वास्तू अभिजात संगीताची मूक साक्षीदार होण्याचे भाग्य घेऊन जन्माला येते, तशीच ही आली असावी. दिवाळी साजरी झाल्यानंतर लगेचच हा स्वरोत्सव साजरा होणार होता. आम्ही रसिक एकेक करून कार्यक्रमस्थळी दाखल झालो. १३, १४ आणि १५ नोव्हेंबर या तीन दिवसांत अत्यंत दर्जेदार कलाकार जवळून ऐकायला, पाहायला मिळणार आणि त्यांचा सहवास लाभणार होता. कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. ओळखीचे रसिक भेटू लागले आणि पुढल्या तीन दिवसांचा मुक्काम सुरू झाला.

धृपदची खोली आणि अनिरुद्ध ऐथलची जादू
कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यावर पहिली कलाकार होती मुग्धा वैशंपायन. पेचदार ताना घेत तिने ‘पूर्वी’ आणि ‘हमीर’ गायला. यानंतर चिंतन उपाध्याय यांनी ‘धृपद’ गायकी सादर केली. धृपद ही प्राचीन गायकी गाणारे कलाकार आता तसे मोजकेच उरले आहेत. पंडित उदयजी भवाळकर यांच्याकडून तालीम घेऊन तयार झालेले चिंतनजी त्यांचे ज्येष्ठ शिष्य. मी वैयक्तिक यापूर्वी विशेष ही गायकी ऐकलेली नसल्याने कनेक्ट व्हायला जरा वेळ गेला. काही गोष्टी समजायला वेळ लागतो हे कबूल करायला काय हरकत आहे? निदान आपण काय ऐकतो आहोत याची जाणीव तरी अशा वेळी होते.
जेवणाच्या विरामानंतर व्यासपीठावर आले सरोदवादक स्वर्णेंदू मंडल. त्यांनी ‘झिंजोटी’ राग लीलया वाजवला आणि त्यांना अप्रतिम अशी साथ केली पंडित रामदास पळसुले यांनी. राजूदादांची तबल्यावरची साथ हा स्वतंत्रपणे ऐकण्याचा विषय आहे. मुख्य वादकाचे गाणे किंवा वादन खुलवताना स्वतः काय आणि किती वाजवावे, याचे त्यांना उपजत भान आहे असे वाटते. त्यांची साथ लाभली की वादकाची पाचही बोटे तुपात असल्यासारखे वाटते. हा अनुभव पुढल्या दिवशी पुन्हा यायचा होता.
पहिल्या दिवसाचा अखेरचा कलाकार होता अनिरुद्ध ऐथल. काही कलाकार पाहिले की पुनर्जन्मावर विश्वास नसला तरी काही अंशी ठेवावा वाटतो, त्यापैकी हा एक युवा कलावंत. अजून तिशीही ओलांडलेली नाही, पण विलक्षण गुणवत्ता आणि टिपकागद असावा त्याप्रमाणे बुद्धी असलेला हा कलाकार. यूट्यूब, इन्स्टाग्रामवर याचे कैक कार्यक्रम ऐकले होते. प्रत्यक्ष ऐकण्याचा योग मात्र या महोत्सवाच्या निमित्ताने आला. राग ‘दरबारी’ आणि ‘परज’ इतके दर्जेदार गायला की कार्यक्रमाचा स्तर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. गायनशैली अगदी किराण्याला साजेशी आणि आवाजाची जातकुळी अस्सल कर्नाटकी ढंगाची. हुबळी, धारवाड, बंगळुरू आदी कानडी प्रांतांत अजून असे किती गवई आहेत, देवास ठाऊक!
एका सवाई गंधर्वांनी देह ठेवला की परंपरा चालवायला भारतरत्न पंडित भीमसेनजी तयार असतात. पुढे ही पताका खांद्यावर घेऊन चालणारे जयतीर्थदादा अथवा व्यंकटेशजी तयार असतात. त्याच वाटेवरून चालणारा हा युवा वारकरी. ताना घ्यायला लागले की संगीतातले हे वाटसरू ‘धार’करी कधी होतील ते कळायचे नाही, इतके बेमालूम गायक या भूमीने अखंड हिंदुस्तानाला दिले आहेत. अनिरुद्धच्या सुरांचा प्रभाव आणि सफेद चारला अगदी तिन्ही सप्तकांत सहजपणे फिरणारा सुरेल गळा म्हणजे काय, याचा प्रत्यय त्या रात्री आला. वेळ संपली तरी श्रोते ‘अजून गा’ असे आर्जव करीत राहिले आणि तो एकावर एक इमले बांधत राहिला. मैफल संपली तेव्हा मनी हुरहूर दाटून आली. तो काही मारवा गायला नव्हता, पण रसिकाच्या मनावर जो ठसा मारवा उमटवतो तोच ठसा त्याने त्या रात्री उमटवला. कानात सूर रुंजी घालत राहिले; मात्र झोप पूर्ण उडाली होती. गाण्याची नशा चढायला आणि दुसऱ्याच्या गाण्याची उतरवायला एकच रामबाण औषध होते — कुमार! तेच अखेर कामी आले.

अश्विनीताईंची जिद्द आणि भोजनाची लज्जत
दुसऱ्या दिवशीचा सकाळचा प्रहर गाजवला तो विदुषी अश्विनीताई भिडे-देशपांडे यांनी. ताईंचा आवाज खरं तर बसला होता. पण खिंड लढवणारे बाजीप्रभू जसे कोणत्याही परिस्थितीत हार मानत नव्हते, तसे उच्च दर्जाचे कलाकार कोणत्याही स्थितीत हार मानत नसतात. आवाज बसला असो अथवा नसो, ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले’ हे काम इमानेइतबारे ते करतातच करतात. ताई तर कसलेल्या कलावंत. त्या कसल्या हार मानतात? ‘ललत’, ‘मंगल भैरव’ आणि ‘कुकुभ बिलावल’ असे तिन्ही बाण रसिकांच्या वर्मी लागले होते. मंगल भैरव तर मर्मबंधातली ठेव बनून राहिला.
ब्रेक झाल्यावर खाली नाश्ता वाट पाहत होता. अभिजात म्युझिक फोरमला तडजोड करणे जणू ठाऊकच नाही! गाणे अप्रतिम, तसेच खाणेही अप्रतिम. हे सलग तिसऱ्या वर्षी मी अनुभवतोय. मी स्वतः किंचित बल्लवाचार्य असल्याने खाण्याची विशेष अभिरुची जपणारा आहे. माझ्यासारखेच अनेक जण असणार यात शंका नाही आणि आयोजक तर नक्कीच! म्हणून ते इतकी सुरेख भोजनव्यवस्था करतात. तृप्त होऊन बाहेर आलो तेव्हा सुखद गारवा मनाला अलगद स्पर्शून गेला. आता पुढचे सत्र ऐकायला आम्ही पुन्हा तयार होतो.

अनवट रागांची मेजवानी आणि जिलबीचा गोडवा
निषाद बाकरे प्रथम गायला बसले. ‘मियाँ की तोडी’ इतकी अप्रतिम रंगली होती की शब्द थिटे पडावेत. अस्सल जयपुरी बुद्धिप्रधान गायकी. त्यांनी नंतर ‘हिंडोल पंचम’ गायला, तोही चांगला होता. निषादजी ‘बहादुरी तोडी’ गातील असे वाटत होते; ती अधुरी इच्छा तिसऱ्या दिवशी रघुदादांनी पूर्ण केली. एकूण निषादजींनी रसिकांवर आपली छाप सोडण्यात किंचितही कसूर केली नाही, एवढे खरे!
यानंतर कल्याण मुजुमदार हे युवा कलावंत सतार वाजवायला रंगमंचावर आले. सतार हे परिपूर्ण वाद्य आहे. त्यांनी सतारीला योग्य न्याय दिला. ‘जोगिया कलिंगडा’ हा नवा राग यानिमित्ताने मला ऐकता आला. तबल्यावर साक्षात पंडित रामदास पळसुले. त्यामुळे पाचही बोटे तुपात असावीत अशी भावना पुन्हा एकदा झाली. वाद्यांना साथ करताना राजूदादा जे काही वाजवतात ते ‘खास’ असते. पंडित रामदास पळसुले या कलाकाराला सरस्वतीचे निराळेच वरदान आहे, अशी अटकळ मी करून घेतली आहे. उगाच डग्यावर कसलातरी आवाज काढत टायमिंग साधल्याचा रसिकांना भास करून देणारे प्रयोग इथे पाहायला मिळत नाहीत. कलावंत जीव ओतून कला सादर करतात. म्हणूनच ‘अभिजात’ हे बिरूद संस्था सार्थपणे मिरवते आहे.
पुढच्या कलाकार होत्या वरदाताई गोडबोले. फार पूर्वी त्यांची रेकॉर्ड ऐकली होती. भावली होती, त्यामुळे अपेक्षा होत्या. त्यांनी ‘गौड सारंग’ सुरू केला आणि आम्ही स्तब्ध झालो. ताना सुस्पष्ट आणि सुरेल. आलापी दर्जेदार. आवाज सानुनासिक आणि प्राचीन गायिकांशी नाते सांगणारा. त्याचा परिणाम इतका होता की दुपारी पुन्हा आलेली झोप उडून गेली. गौड सारंग आणि शुद्ध सारंगची ही खासियत आहे की ते रसिकांच्या काळजात घुसतात. हा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी खुसखुशीत जिलबीचा बेत खाली स्वागताला हजर होता. आयोजकांनी रसिकांचे इतकेही लाड करू नयेत! त्याने काय होते, की लोणावळा सोडताना पाय जड होतात. ‘कन्या सासुरासी जावे, मागे परतुनी पाहे’ इतकी तरी अवस्था करू नये!

घरगुती आपुलकी आणि तळवलकर गुरुजींची मुलाखत
पुढील सत्रात पंडित मुकुंदराज देव आणि रोहित देव यांचे स्वतंत्र तबलावादन आणि शीतल कोळवलकर यांचा कथ्थक नृत्याविष्कार झाला. यानंतर विदुषी श्रुतीताई सडोलीकर-काटकर यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस संस्थेने साजरा केला. तो साजरा होताना औपचारिक विषय नव्हता. एखादा घरगुती समारंभ वाटावा असा मायेचा ओलावा त्यात भासला. इथे कलाकारांची मैफल संपली की त्यांचा निरोप घेऊन लगेच पुढचा कार्यक्रम गाठायचा, एवढेच घडत नाही. त्या कलाकारांचा सहवास मिळतो, त्यांच्या जवळ जाण्याची संधी मिळते. याचे महत्त्व केवळ तिथे हजर राहिलेल्या रसिकालाच समजेल.
तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांच्या मुलाखतीच्या प्रतीक्षेत आमच्यासारखे बरेच रसिक होते. मुलाखत घेणार होते प्रतिवर्षाप्रमाणे मुकुंदजी आठवले काका. अत्यंत सरळ आणि मार्मिक प्रश्न त्यांनी विचारले आणि गुरुजींनी अतिशय दिलखुलास उत्तरे दिली. त्यांच्या वाणीत केवळ विद्वत्ता नव्हती, तर अनेक गुरुजनांच्या समवेत त्यांनी जो प्रदीर्घ काळ घालवला त्या अनुभवांची ती शिदोरी होती. त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व यानिमित्ताने जाणून घेता आले. विशेषतः गुरूंचा सहवास आणि तालीम यांचे महत्त्व त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले, ते पुढल्या दिवशी रघुदादांचे गाणे ऐकताना पुन्हा आठवणार होते.

अत्तराचा सुगंध आणि सखोल धृपद गायन
दुपारच्या सुट्टीत राजूदादांचा हात आदराने हाती घेतला आणि त्यावर मी अत्तर लावले. अचानक तिथे गुरुजी आले. मी विचारले, ‘आपल्याला लावलं तर चालेल का?’ कारण माझा असा प्रत्यक्ष संपर्क कधीही त्यांच्याशी आला नव्हता. त्यात ते सर्वच बाबतीत ज्येष्ठ कलावंत. माझा प्रश्न संपायच्या आत ‘हो, चालेल ना! मला अत्तर फार आवडतं,’ म्हणाले. मी आदराने हात हाती घेऊन अत्तर लावले. निघालो तोच त्यांनी मला अडवले. स्वतःच्या खिशातून एक अत्तर काढले आणि म्हणाले, ‘हात कर पुढे.’ त्यांनी अत्तर हाताला लावले खरे, पण सुगंध मात्र मनात खोलवर दरवळत होता. आभाळाइतके मोठे कलाकार गुरुजी आणि मी एक सामान्य रसिक, यांची ती भेट अनोखी होती. अन्य कोणत्या महोत्सवात असे घडत असेल, याची कल्पना नाही. या संस्थेचे रसिक तोंडभरून कौतुक करतात, कारण असे क्षण सर्वत्र अनुभवायला मिळत नाहीत.
रात्रीच्या प्रहरी पंडित उदय भवाळकर यांचे धृपद गायन झाले. त्यावर अधिक लिहीत नाही. माझ्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर एकूण सगळा व्यवहार होता. फारच कठीण आहे धृपद गायकी, एवढे मात्र नक्की कळले. पहिल्या दिवशी त्यांच्या शिष्याचे गायन ऐकले होते आणि आता गुरूंचे. या गायकीला समजून घेण्यासाठी आपले ऐकणेही अजून बरेच तयार व्हायला हवे, हे जाणवले. यानंतर विदुषी श्रुतीताई सडोलीकर-काटकर यांचे गायन झाले. त्यांनी ‘शुद्ध नट’ आणि ‘नायकी कानडा’ गायला. शुद्ध नट हा जयपूर घराण्याचा विशेष राग. भैरवीच्या सुरांनी त्या दिवसाच्या मैफलीची सांगता झाली. स्मृतींच्या कुपीत आणखी काही गोष्टी बंद करून झाल्या. महोत्सव सुरू झाला म्हणता म्हणता आता शेवटचा दिवस उजाडणार होता.

‘बहादुरी तोडी’ची समाधी आणि तालीमचे मर्म
अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन गायक गाणार होते. दोघेही अत्यंत आवडते कलाकार. एक पंडित रघुनंदन पणशीकर आणि दुसरे पंडित राम देशपांडे. रामदादांच्या जोडीला त्यांचा मुलगा गंधार देशपांडेही सहगायन करणार असल्याने अधिक उत्सुकता होती. तोही तितक्याच तयारीने गातो असे ऐकून होतो; रेकॉर्ड्स ऐकल्या होत्या. त्यामुळे काहीही झाले तरी दोन्ही कार्यक्रमांचा एक मिनिटसुद्धा चुकवायचा नाही, हे ठरवूनच आम्ही आलो होतो.
प्रथम सत्रात रघुदादा ‘बहादुरी तोडी’ गाऊ लागले. कैक दिवसांची मनातली सुप्त इच्छा पूर्ण झाली. एखाद्या ताकदीच्या कलाकाराने तो गावा आणि आपण फक्त शांत बसून डोळे मिटून तो ऐकावा, यासारखा आनंद नाही. अर्थात परिसस्पर्श झालेला एखादा कलावंत कोणत्याही रागाचा हिमालय करू शकतो हा भाग वेगळा. परंतु काही राग दुर्मिळ असतात, अप्रचलित असतात. एखाद्या वेळी ते ऐकले की पुन्हा पुन्हा त्यांची पारायणे करावीत असे वाटते. त्यापैकी एक बहादुरी तोडी. ‘ये महादेव देवन पते’ ही बंदिश सुरू झाली आणि अक्षरशः कोणतेच भान उरले नाही. रघुदादांना किशोरीताईंनी किती आणि काय दर्जाचे गाणे दिले असेल याची कल्पना प्रत्यक्ष ऐकताना मिनिटामिनिटाला होत राहते. सिद्धहस्त गायकी! एका विशिष्ट साधनेनंतर सूरच ‘श्वास’ बनून राहत असावेत अशा गायकांचे. कैफ चढतो ना गाण्याचा, तो पहिल्याच सत्रात चढायला लागला होता.
‘यमनी बिलावल’ हा राग यानंतर त्यांनी सादर केला. ‘आऊट ऑफ सिलॅबस’ काही ऐकायचे असेल तर ते इथेच ऐकायला मिळते. त्यामुळे गाण्यात, वाद्यसंगीतात जे करिअर करू इच्छितात त्यांनी तर हा महोत्सव अजिबात चुकवता कामा नये. माझ्यासारखे सामान्य रसिक सर्व ऐकणार आणि आनंद घेणार फक्त! विद्यार्थी आले तर त्यांना विद्या मिळेल अशा माध्यमातून. पण तो टक्का फार कमी दिसतोय एकंदरीत. क्रॅश कोर्स केल्याप्रमाणे संगीतकला शिकू नये, पण आजकाल तोच जमाना आला आहे. जगणे आणि जिवंत असणे या दोन बाबींत जितका मोठा फरक आहे, तेवढा फरक चांगल्या गुरूंकडे जाऊन तालीम घेणे आणि क्रॅश कोर्स करणे या दोन बाबींत आहे. गुरूंच्या सहवासाचे जे महत्त्व तळवलकर गुरुजी आदल्या दिवशी विशद करत होते, ते रघुदादा गाताना अगदी गडदपणे नजरेत भरले.

पिता-पुत्रांची जुगलबंदी आणि महोत्सवाची फलश्रुती
शेवटचे सत्र गाजवले ते पंडित राम देशपांडे आणि गंधार देशपांडे यांनी. राग ‘सालगवराळी’ त्यांनी निवडला होता. ‘कट्यार’मध्ये सदाशिव गातो त्या ‘घेई छंद मकरंद’ची चाल अभिषेकीबुवांनी या रागात केली असल्याने तो राग सर्वश्रुत झाला. प्रत्यक्ष ख्याल मात्र कधी ऐकलेला नव्हता. मालिनीताईंच्या रेकॉर्डमधून ही बंदिश एक-दोन वेळा ऐकल्याचे स्मरते. तीच अप्रतिम बंदिश रामदादा आणि गंधार गायले. ‘आज बधाई बाजे, नंद महेल में सखी’ – काय अप्रतिम रचना आणि राग तेवढाच मधुर! गाणारे ताकदीचे, स्वतंत्र शैली असलेले पिता-पुत्र, ज्यांच्या आवाजाची फिरत असामान्य आहे, असा सगळा योग जुळून आल्यावर पानात पंचपक्वान्ने असल्याचा अनुभव आला नाही तरच आश्चर्य!
गॅलरीत उभा असताना आतल्या भैरवीचे सूर कानावर येत होते. अखेरच्या सत्रातील दोन्ही कार्यक्रम ही महोत्सवाची ‘फलश्रुती’ होती. गुरुजी एखादा याग संपन्न झाल्यावर ‘शांतिरस्तु, पुष्टिरस्तु, समृद्धिरस्तु’ म्हणतात ना, तसे प्रासादिक वाटावे असा हा महोत्सव देखणा झाला. कधीही दृष्ट लागू नये या सांस्कृतिक वैभवाला. रसिकांची संख्या वाढेल न वाढेल, माहीत नाही. पण शंभर-दोनशे उपस्थित रसिकांच्या ओंजळीत जी स्वररूपी फुले इथे आयोजक पाठवणी करताना देतात, त्यांचा सुगंध कायम दरवळत राहतो.
सुरुवातीला म्हटले, मी उगाचच मैफलीतून उठून बाहेर आलो. खरं सांगायचे तर उगाच नव्हते. तीन दिवस इतके सगळे ऐकल्यावर मन खरे तर भरायला हवे होते! उलट त्यावेळी मनात एकच प्रश्न होता; भैरवी इतक्यात कशाला?

अन्य लेख

संबंधित लेख