Monday, January 26, 2026

फडणवीस यांनी थेट तारीखच सांगितली! इंदू मिल स्मारकावर पुढील अभिवादन कधी होणार? आंबेडकर अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण!

Share

मुंबई : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे जाऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांशी त्यांनी संवाद साधला.

‘डॉ. आंबेडकरांनी समतेचे रोपण करून समाज जागरूक केला’

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. “आपल्या देशात जी प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती आणि ज्यामुळे अनेकांचा मानव म्हणून जगण्याचा अधिकार हिरावला गेला होता, अशा परिस्थितीत समाजामध्ये मोठी जागृती आणून एक समतायुक्त समाज तयार झाला पाहिजे या भावनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान संपादित केले,” असे ते म्हणाले. या ज्ञानाच्या आधारावर त्यांनी समाजात समतेचे रोपण करून समाज जागरूक केला आणि स्वतंत्र भारतासाठी समतेचे राज्य तयार करणारे संविधान आपल्याला दिले. या संविधानाने समाजात बंधुता निर्माण केली असून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.

अर्थव्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्रातील योगदान

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. याची मुहूर्तमेढ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रोवली आहे. याव्यतिरिक्त, राज्याच्या प्रगतीत आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे योगदान दिले आहे, ज्यामुळे आज देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

संविधान जगातील सर्वोत्तम; इंदू मिल स्मारकासाठी प्रयत्न

“संविधानाने उभी केलेली लोकशाहीची व्यवस्था भारताच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वी इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट व इतर मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख