नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे ‘सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२५’ निमित्त निधी संकलनाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. भारतीय सेनेचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण आणि तिरंग्याची शान कायम राखण्यासाठी भारतीय सैनिकांनी प्रत्येकवेळी आपल्या प्राणांची बाजी लावली. सैनिक देशाचे रक्षण करतात म्हणूनच आपण शांततेत जगू शकतो, प्रगती साधू शकतो आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देऊ शकतो. अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय सेनेने जगाला आपली सामरिक क्षमता दाखवून दिली असून आज भारताची सेना जगातील शक्तिशाली सैन्यांमध्ये गणली जाते, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले की, 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली जाणारी मदत ₹3 लाखांवरून वाढवत ₹25 लाख करण्यात आली आणि नंतर ती वाढवून ₹1 कोटी करण्यात आली. शहीदांच्या बलिदानाचे मोल पैशांत मोजता येत नसले तरी त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक आधार महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. माजी सैनिक कल्याण विभागामार्फत शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी संकलित करण्यात येणारा निधी हा सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उपयोगात येतो. सामान्य माणूस आपल्या व्यवसायातून, वेतनातून किंवा पेन्शनमधून स्वेच्छेने निधी देत आहे, हे नमूद करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आणि भारतीय सेनेबद्दल समाजाच्या मनात असलेल्या श्रद्धेचे व कृतज्ञतेचे द्योतक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पुढेही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून निधी संकलनाला व्यापक प्रतिसाद देण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
मागील वर्षी निधी संकलनात महाराष्ट्रातील नागपूर विभागाने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल विभागीय आयुक्त आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.