नागपूर : नागरिकांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी अत्यंत सुंदर अशी संविधानिक चौकट भारतीय संविधानाने आखून दिलेली आहे. बंधुत्व आणि लोकशाहीचा भाव संविधानात आहे. संविधानाने समाजाला, राष्ट्राला जोडण्याचे काम केले. सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.
भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर 26 मार्च 2025 रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन येथे प्रकाशित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विधिमंडळाच्या वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे या पुस्तकाचे संकलन आणि संपादन करण्यात आले आहे. या पुस्तक प्रकाशनप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्रिमंडळ व विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.
राजभवनचे नामकरण लोकभवन झाले आहे, याचा आनंद आहे. आज भारत जगातील दुसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे आपला देश आता वेगाने विकसित होत आहे. संविधानातील बारकावे या पुस्तकातून जाणून घेता येईल. इतर भाषेतही या पुस्तकाचा अनुवाद व्हावा, असे राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले.