मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा) गटावर जोरदार टीका करत त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘राक्षसाचा जीव पोपटात’ आणि हिंदुत्वाचे ढोंग
रवींद्र चव्हाण यांनी उबाठा गटावर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.
“हिंदुत्वाच्या भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणारे आता पुन्हा हिंदुत्वावर बोलू लागलेत, कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे.” असे उपरोधिक विधान त्यांनी केले. ते म्हणाले की, आता ‘प्रत्येक मंदिरात दिवा लागलाच पाहिजे’ असं ते म्हणत आहेत. त्यांनी उबाठा गटाच्या बदललेल्या भूमिकेची तुलना ‘राक्षसाचा जीव पोपटात अडकला आहे’ या म्हणीशी केली.
‘कार्तिगई दिपम’ आणि ‘वंदे मातरम्’वरून प्रहार
‘कार्तिगई दिपम’ ही प्राचीन हिंदू परंपरा चालू ठेवण्याची परवानगी देणाऱ्या न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन यांच्याविरोधात आणलेल्या महाभियोग प्रस्तावावर त्यांच्या (उबाठा) खासदारांनी सही का केली? हे त्यांनी देशवासियांना सांगितले पाहिजे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवणाऱ्यांना ‘वंदे मातरम्’ हा ‘वनडे’ सामना वाटला तर त्यात नवल ते काय, अशी टीकाही त्यांनी केली.
ध्येय ‘परमवैभव’चे!
प्रेरणा देणारा मूलमंत्र: “आपल्या भारतमातेला परमवैभवाच्या शिखरावर घेऊन जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी परिवारातील प्रत्येक कार्यकर्त्याचा ध्यास आहे.” ‘वंदे मातरम्’ हा आम्हाला प्रेरणा देणारा मूलमंत्र आहे, जो आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत शिरसावंद्य राहील, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्व आणि राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे आहेत.