Friday, January 9, 2026

“रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका खोचक कवितेच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. “कितीही रडा, पण मुंबई तुम्हाला नाकारणारच,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

काय आहे केशव उपाध्ये यांचे ट्विट?
उपाध्ये यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून मोजक्या पण धारदार शब्दांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे:

“रडा कितीही, भुई धोपटा
खोटी वचने, खच्चून थापा

करा कसाही बो भा टा
नक्की समजा, मुंबईच
नाकारणार हा उ बा ठा…”

मुंबई महानगरपालिकेवर अनेक वर्षे ठाकरेंची सत्ता राहिली आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणानंतर भाजपने आता मुंबईवर आपली पकड मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. उपाध्ये यांनी आपल्या कवितेत ‘खोटी वचने’ आणि ‘थापा’ अशा शब्दांचा वापर करून ठाकरे गटाने मुंबईकरांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. केशव उपाध्ये यांनी थेट ‘उबाठा’ असा उल्लेख करून, आगामी निवडणुकीत मुंबईकर कोणाच्या बाजूने उभे राहतील, याचे चित्र आताच स्पष्ट असल्याचा दावा केला आहे. या ट्विटमुळे आता ठाकरे गटाकडून काय उत्तर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख