Sunday, January 11, 2026

मुंबईत जन्म होऊन म्हातारे होऊ लागलात, तरीही..; ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा हल्लाबोल

Share

मुंबई : “मुंबईत जन्म होऊन आता म्हातारे होऊ लागलात, तरीही आजपर्यंत मुंबईची एकही समस्या सोडवू शकला नाहीत,” असा घणाघाती हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंवर केला. अंधेरी येथे शुक्रवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

भाजप नेते आणि मुख्यमंत्री मुंबईत जन्मलेले नसल्याने त्यांना मुंबईच्या प्रश्नांची माहिती नाही, अशी टीका ठाकरे बंधूंनी यापूर्वी केली होती. या टीकेचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईची संकल्पना, तिचा विकास आणि सामान्य माणसाचे प्रश्न यांची सखोल जाण होती. मात्र बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला होता,” असे त्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, “ज्यांचा जन्म मुंबईत झाला, ते आज वयस्कर होत असतानाही मुंबईसाठी नेमके काय केले, हे दाखवू शकत नाहीत. मुंबईतील एकही मोठी समस्या त्यांनी सोडवली नाही. मराठी माणूस आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी त्यांनी काय योगदान दिले, हेही ते सांगू शकत नाहीत. मग केवळ मुंबईत जन्म झाला म्हणून हारतुरे घालायचे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळात मुंबईत सुरू करण्यात आलेल्या विविध मेट्रो प्रकल्पांचा उल्लेख करत, मुंबईत खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणल्याचे सांगितले. उपनगरी लोकल गाड्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवाशांना करावा लागणारा जीवघेणा प्रवास लक्षात घेऊन राज्य सरकारने रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी मेट्रोच्या धर्तीवर उपनगरी लोकल गाड्यांचे डबे वातानुकूलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ केली जाणार नाही. दुसऱ्या वर्गाच्या भाड्यात एक रुपयाचीही वाढ न करता मुंबईकरांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येईल,” असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

तसेच बीडीडी चाळ, अभ्युदय नगर यांसारखे महत्त्वाचे गृहनिर्माण व पुनर्वसन प्रकल्प आमच्या सरकारच्या काळात मार्गी लागले असल्याचे सांगत, ठाकरे यांच्या कार्यकाळात मराठी माणसासाठी आणि पुनर्वसनासाठी नेमके काय केले, असा सवाल करत त्यांनी विरोधकांवर पुन्हा निशाणा साधला.

अन्य लेख

संबंधित लेख