नाशिक : “ज्यांनी नाशिकमध्ये येऊनही प्रभू श्रीरामांचे नाव घेतले नाही, त्यांच्यात आता राम उरलेला नाही. जो रामाचा नाही, तो कोणाच कामाचा नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘विजयी संकल्प सभे’त ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासाचा ‘रोडमॅप’ सादर करत आगामी पाच वर्षांत शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले.
या सभेला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक ठरणार लॉजिस्टिक आणि टेक्नॉलॉजी हब
नाशिकच्या औद्योगिक विकासावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिकला केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे, तर मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक आणि टेक्नॉलॉजी हब म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस आहे.
कनेक्टिव्हिटी: नाशिक विमानतळाचे विस्तारीकरण, नवीन रिंग रोड, नाशिक-पुणे आणि नाशिक-सोलापूर-अक्कलकोट हे ६ पदरी महामार्ग नाशिकला नवी ओळख देतील.
वाढवण बंदराशी जोडणी: नाशिकला जागतिक दर्जाच्या वाढवण बंदराशी जोडले जाईल, ज्याचा थेट फायदा स्थानिक उद्योगांना होईल.
मुंबईशी जवळीक: आमणे फाट्यापासून थेट ईस्टर्न फ्रीवेला जोडणारा रस्ता तयार केला जाणार असून, यामुळे नाशिक-मुंबई प्रवास अधिक वेगवान होईल.
पाणी आणि स्वच्छतेवर भर
नाशिककरांचा जिव्हाळ्याचा असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गंगापूर धरणाची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. तसेच, दक्षिण गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सुरक्षा आणि ‘तिसरा डोळा’
“नाशिकमध्ये आता गुंडांचे नव्हे, तर कायद्याचे राज्य आहे,” असे सांगत फडणवीस यांनी शहराच्या सुरक्षेवर भर दिला. शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले जात असून, हे तंत्रज्ञान पोलिसांसाठी ‘तिसऱ्या डोळ्या’चे काम करेल, ज्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसेल. नवीन एमआयडीसीच्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन त्यांनी दिले.
१५ तारखेला ‘विजयी संकल्प’ करण्याचे आवाहन
सनातन धर्माची आणि संस्कृतीची ओळख असलेला कुंभमेळा कोणीही रोखू शकत नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी २०१५ च्या कुंभमेळ्याच्या आठवणींना उजाळा दिला. “नाशिकच्या प्रगती आणि उन्नतीसाठी येत्या १५ तारखेला भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, पुढची ५ वर्षे नाशिकच्या विकासाची जबाबदारी आमची असेल,” असे आवाहन करत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.