मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या महासंग्रामाचा निकाल आज जाहीर होत असून, यात भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. सर्वांत जास्त चर्चा रंगली ती मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक १३५ ची, जिथे भाजपचे माध्यम प्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी नवनाथ बन (Navnath Ban) यांनी विजय मिळवून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.
मानखुर्दमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले!
नवनाथ बन यांनी पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक लढवली होती. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेल्या नवनाथ बन यांना भाजपने मानखुर्दसारख्या आव्हानात्मक वॉर्डातून रिंगणात उतरवले होते.
त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या समीक्षा सक्रे, राष्ट्रवादीच्या अक्षय पवार आणि काँग्रेसच्या वसंत कुंभार यांनी तगडे आव्हान उभे केले होते. गेल्या निवडणुकीत या वॉर्डात शिवसेनेचा (अविभाजित) विजय झाला होता, मात्र यावेळी नवनाथ बन यांनी हा गड खेचून आणत फडणवीसांचे ‘धक्कातंत्र’ यशस्वी करून दाखवले आहे.
मानखुर्दमध्ये नवनाथ बन यांच्या विजयामुळे दक्षिण-पूर्व मुंबईतील भाजपची ताकद वाढली आहे. ‘माध्यम प्रमुख’ ते ‘नगरसेवक’ असा त्यांचा प्रवास भाजपच्या आगामी रणनितीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
नवनाथ बन यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार समीक्षा सक्रे यांचा ८,५७८ मतांच्या निर्णायक फरकाने पराभव करत विजयाचा झेंडा फडकवला. बन यांच्या विजयाची बातमी समजताच मानखुर्द आणि भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला.
नवनाथ बन यांच्या विजयासाठी भाजपने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. या वॉर्डातील राजकीय वातावरण तापवण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली होती. भोजपुरी सुपरस्टार आणि माजी खासदार मनोज तिवारी यांनी नवनाथ बन यांच्यासाठी मानखुर्दमध्ये रोड शो आणि सभा घेऊन मोठी गर्दी खेचली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रभागात जाहीर सभा घेऊन विकासाचा अजेंडा मतदारांसमोर मांडला होता.
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या वॉर्डात भाजपने मारलेली ही मुसंडी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. नवनाथ बन या युवा चेहऱ्यावर मतदारांनी दाखवलेला हा विश्वास महायुतीच्या विकासकामांची पावती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. बन यांचा दांडगा जनसंपर्क आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ यामुळेच मानखुर्दमध्ये पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलवणे शक्य झाले आहे.