मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भाजपने मिळवलेल्या यशानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे ‘मुंबईचा महापौर कोण होणार?’ या प्रश्नाकडे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महापौरपदाचा पेच सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
“वरच्या देवानेच ठरवलंय…”
मुंबईच्या महापौरपदाबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस मिश्किलपणे म्हणाले, “वरच्या देवानेच महायुतीचा महापौर करायचा आहे, असं ठरवलं आहे. त्यामुळे महापौर आमचाच होईल यात शंका नाही. मात्र, तो नेमका कोण असेल, हे मी आणि एकनाथ शिंदे एकत्र बसून निश्चित करू.” फडणवीस यांच्या या विधानाने महायुतीमध्ये समन्वय असल्याचे संकेत दिले असले, तरी नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.
अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?
मुंबई महानगरपालिकेत भाजप (८९ जागा) सर्वात मोठा पक्ष असला, तरी सत्तास्थापनेसाठी शिंदे गटाची (२९ जागा) मदत अनिवार्य आहे. याच मुद्द्यावरून “महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेतले जाणार का?” असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. “महापौर कोण होणार, निवड कधी होणार आणि हे पद कोणाकडे किती वर्षे राहणार, या सर्व तांत्रिक बाबी आम्ही दोघे बसून सामोपचाराने ठरवू. आमच्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही. आम्ही छान पद्धतीने दोन्ही पक्ष चालवून दाखवू,,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी आणि हिंदू चेहराच!
निवडणुकीच्या प्रचारापासूनच भाजपने ‘हिंदू आणि मराठी’ महापौराचा मुद्दा लावून धरला होता. आजही मुख्यमंत्र्यांच्या विधानातून हेच संकेत मिळत आहेत की, मुंबईच्या अस्मितेचा विचार करूनच एखादा सक्षम मराठी चेहरा महापौरपदाच्या खुर्चीवर बसवला जाईल. मात्र, भाजप आपलाच महापौर करण्यासाठी आग्रही राहणार की मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेला संधी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मुंबई महायुतीचे समीकरण:
भाजप: ८९ जागा
एकनाथ शिंदे शिवसेना: २९ जागा
एकूण: ११८ (बहुमतासाठी ११४ आवश्यक)