मुंबई : राजकारणात ‘असंगाशी संग’ केल्याचा परिणाम काय होतो, याचे जिवंत उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीतून समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. “उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीचा सर्वाधिक फटका राज ठाकरे यांच्या पक्षाला बसला असून, उबाठाने मनसेचा वापर करून आपली मतटक्केवारी वाढवून घेतली,” असा खळबळजनक दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
आकडेवारीचा दिला दाखला
केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून (X/Twitter) मुंबईतील मतटक्केवारीचे सविस्तर विश्लेषण मांडले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
आकडेवारी काय सांगते? (मतटक्केवारीतील फरक)
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत दोन्ही पक्षांच्या मतटक्केवारीत मोठा बदल झाला आहे:
| पक्ष | विधानसभा निवडणूक मते (%) | महापालिका निवडणूक मते (%) | फरक |
| मनसे | ७.१३ % | २.९१ % | -४.२२% (घसरण) |
| उबाठा | २३.२२ % | २७.४७ % | +४.२५% (वाढ) |
मनसेची घसरण: दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मुंबईत ७.१३ टक्के मते मिळाली होती. मात्र, महापालिका निवडणुकीत ही टक्केवारी कमालीची घसरून केवळ २.९१ टक्क्यांवर आली आहे.
उबाठाचा फायदा: दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत २३.२२ टक्के मते घेणाऱ्या उबाठा गटाने महापालिका निवडणुकीत मुसंडी मारत २७.४७ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.
“मनसेची मते वळली, पण उबाठाची नाही!”
या आकडेवारीचे विश्लेषण करताना उपाध्ये यांनी म्हटले आहे की, “मनसेच्या मतांचा फायदा उबाठाला झाला आणि त्यामुळे त्यांची मतसंख्या वाढली. मात्र, निवडणूक निकालांनी हे अधोरेखित केले आहे की, उबाठाची मते मनसेच्या उमेदवारांकडे वळलीच नाहीत.” मनसेच्या कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळला, पण उबाठाकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही, असेच या आकडेवारीवरून दिसून येते.
‘असंगाशी संग’ पडला महागात!
“असंगाशी संग केल्याचा फटका मनसेला किती महागात पडला, हे आता स्पष्ट झाले आहे,” अशा शब्दांत उपाध्ये यांनी मनसेला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईच्या राजकारणात मराठी मतांच्या विभागणीचा फायदा कोणाला झाला आणि कोणाचे अस्तित्व धोक्यात आले, हे आता उघड झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.