Wednesday, November 25, 2026

ध्वज समतेचा उंच धरा रे…

Share

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली, ही घटना मराठी साहित्यविश्वाच्या इतिहासातील एक अत्यंत मोलाची आणि क्रांतिकारी पाऊलखुण आहे. ज्या क्षणी या निवडीची घोषणा झाली, त्या क्षणी महाराष्ट्रातील प्रत्येक संवेदनशील, समतावादी मनाने तिचे मनापासून, खुलेपणाने स्वागत करायला हवे होते. कारण, हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नाही, तर शतकानुशतके प्रस्थापित व्यवस्थेच्या परिघाबाहेर ठेवल्या गेलेल्या एका विशाल जनसमुदायाच्या सर्जनशील हुंकाराचा हा सन्मान आहे. परंतु, दुर्दैवाने आज नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक निवडीचे निर्मळ मनाने स्वागत करण्याऐवजी काही कोत्या मनोवृत्तीच्या वर्तुळांतून खुसपटे काढणे, उपहास करणे, टिंगलटवाळी करणे आणि कुजकेपणाने टीका करणे सुरू झाले आहे. समाजातील वंचित घटकांच्या कष्टाचे, वेदनेचे आणि संघर्षाचे प्रतीक असलेला हा सन्मान पचवणे काहींना जड का जात आहे? अशा वेळी हे ठणकावून सांगणे क्रमप्राप्त ठरते की, लिंबाळे यांच्या निवडीचे स्वागत न करता केवळ खुसपटे आणि टिंगलटवाळीत अडकून पडणे, हा समतेच्या प्रवासाशी केलेला उघड उघड द्रोह आहे.

इतिहासाच्या साक्षीने दिलेले कृतिशील उत्तर

हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शंभरावे वर्ष आहे; हा एक दुर्मिळ आणि ऐतिहासिक योग आहे. या शतकी प्रवासाच्या उंबरठ्यावर उभे राहून मागे वळून पाहिले, तर महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण होते. जेव्हा पुण्यात पहिले मराठी साहित्य संमेलन भरले होते, तेव्हा या देशातील सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिराव फुले यांनी या संमेलनाचे कर्तेधर्ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना धारदार आणि मूलभूत प्रश्न विचारला होता— ‘हे संमेलन नेमके कुणाचे आहे?’ ‘या घालमोड्या दादांच्या संमेलनात आम्हाला रस नाही,’ असे महात्मा फुले यांचे तेव्हा शब्द होते. ज्या कष्टकरी, शूद्र-अतिशूद्र समाजाच्या घामावर ही भूमी उभी आहे, त्या समाजाचा साधा उल्लेखही ज्या संमेलनात नाही, ते संमेलन आमचे कसे, असा रोकडा सवाल फुले यांनी उपस्थित केला होता. तब्बल शंभर वर्षांनंतर, या शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्यविश्वाने महात्मा फुले यांच्या त्या ऐतिहासिक प्रश्नाचे कृतिशील आणि स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे ‘हे संमेलन आता केवळ मूठभरांचे राहिले नसून ते खऱ्या अर्थाने सर्वजनांचे झाले आहे,’ याची ग्वाही आहे.

पुरोगामी बुरख्याआडचा छुपा जातीयवाद

साहित्यविश्वातील या ऐतिहासिक वळणावर उभे असताना, लिंबाळे यांच्यावर होणाऱ्या टीकेचे स्वरूप तपासणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत समाजात जातीयवाद पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. ज्यांच्याकडून समतेची आणि परिवर्तनाची अपेक्षा असते, असे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे दीडशहाणे आज नकळत किंवा जाणीवपूर्वक जातीयवादी होत आहेत. खुद्द लिंबाळे यांनीच परखड शब्दांत या प्रवृत्तीवर बोट ठेवले आहे. जेव्हा ‘सनातन’सारख्या कादंबरीसाठी मराठीला तब्बल वीस वर्षांनंतर राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च असा ‘सरस्वती सन्मान’ मिळतो, तेव्हा संपूर्ण मराठी सारस्वतांनी त्याचा आनंद साजरा करायला हवा होता. मात्र, एका विशिष्ट पुरस्काराच्या निमित्ताने किंवा त्यांच्या संवादवादी भूमिकेवरून लिंबाळे यांना लक्ष्य करण्यात आले. स्वतःच्याच वर्तुळातील काहींनी त्यांचे अभिनंदन करणेही टाळले आणि त्यांच्यावर वैचारिक बहिष्काराचे अस्त्र उगारले. हा प्रकार म्हणजे सामाजिक चळवळींमध्ये शिरलेली अघोषित हुकूमशाहीच आहे. जर समाजात मोकळेपणाने संवादच होऊ दिला जाणार नसेल, तर लोकशाही मूल्ये कशी नांदणार? आणि संवादच खुंटला, तर सामाजिक परिवर्तनाचे चाक पुढे कसे सरकणार, हा लिंबाळे यांचा प्रश्न आज प्रत्येक विवेकी माणसाला अंतर्मुख करायला लावणारा आहे.

सर्वजनवादाचा विस्तार आणि वेदनेचा हुंकार

साहित्य हे केवळ मनोरंजनाचे किंवा रंजनवादी पाट्या टाकण्याचे साधन नसते; ते मानवी वेदनेचा आणि जगण्याच्या संघर्षाचा दस्तऐवज असते. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनापासून ते ‘सनातन’ या महाकादंबरीपर्यंतच्या प्रवासात भारतीय समाजातील जातिव्यवस्थेचे आणि विषमतेचे ऐतिहासिक व सांस्कृतिक पदर ज्या ताकदीने उलगडून दाखवले आहेत, त्याला तोड नाही. त्यांच्या साहित्याचा अभ्यास आज देशातील अनेक विद्यापीठांमध्ये केला जातो, यावरूनच त्यांच्या लेखणीची जागतिक आणि राष्ट्रीय उंची स्पष्ट व्हावी. मराठी साहित्याच्या अंगणात रुजत जाणारा हा ‘सर्वजनवाद’ केवळ एका संमेलनापुरता मर्यादित न राहता, पुढे सर्व समाजात पाझरायला हवा. समाजातील सर्व स्तरांतील, सर्व वर्गांतील माणसांच्या वेदनांचे सर्जनशील उद्गार मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात पूर्ण ताकदीने सामावून घेतले गेले पाहिजेत. तरच मराठी भाषा आणि मराठी साहित्य खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सर्वसमावेशक होईल. कोणाच्याही इशाऱ्यावर न नाचता, केवळ आपल्या विवेकाशी आणि समतावादी विचारांशी प्रामाणिक राहून संवाद साधण्याची लिंबाळे यांची भूमिका ही या सर्वजनवादाला अधिक बळ देणारी आहे.

उपेक्षितांना मिळणारे नैतिक बळ

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक नकाशावर आजही असे अनेक वंचित, भटके, विमुक्त आणि उपेक्षित समाजघटक आहेत, ज्यांचा आवाज अद्याप मुख्य धारेत म्हणावा तसा पोहोचलेला नाही. व्यवस्थेच्या तळाशी खितपत पडलेल्या या लाखो लोकांना आपल्या व्यथा मांडण्यासाठी व्यासपीठाची प्रतीक्षा आहे. सोलापूर जिल्ह्यातील हन्नूरसारख्या एका छोट्या गावातून आलेल्या, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आकाशवाणीपासून ते शिक्षणक्षेत्रातील उच्चपदांपर्यंत मजल मारणाऱ्या लेखकाची जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सर्वोच्च पदावर निवड होते, तेव्हा त्याचा संदेश दूरवर जातो. महाराष्ट्रातील ज्या समाजघटकांचा आवाज आजही क्षीण आहे, त्या प्रत्येक घटकाला या निवडीमुळे नैतिक बळ मिळणार आहे. ‘आपणही या मुख्य प्रवाहाचा अविभाज्य भाग होऊ शकतो आणि आपली वेदनाही या सारस्वत महाराष्ट्राला ऐकावी लागेल,’ हा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्या मनात जागा होणार आहे.

समतेचा लढा अधिक तेजस्वी करूया

शेवटी, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा काही केवळ मिरवण्याचा विषय नाही, तर ती एक वैचारिक जबाबदारी आहे. आपल्या विचारांच्या आणि लेखणीच्या जोरावर विषमतेच्या भिंती पाडण्याचे काम लिंबाळे यांनी आयुष्यभर केले आहे. आता संमेलनाध्यक्षपदाच्या माध्यमातून हीच समतेची, बंधुतेची आणि मानवतेची पताका अधिक उंच फडकवण्याची संधी आहे. या ऐतिहासिक क्षणी आपण सर्व मतभेद, आकस आणि संकुचित विचार बाजूला सारले पाहिजेत. खुसपटे काढणाऱ्यांच्या कोत्या वृत्तीला फाटा देऊन, मराठी साहित्यातील या सर्वजनवादी प्रवाहाचे मनःपूर्वक स्वागत करायला हवे. महात्मा फुले यांनी पाहिलेले स्वप्न आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, मराठी सारस्वतांनी आता तरी मनाची कवाडे खुली करावीत आणि शंभराव्या साहित्य संमेलनात उंच झालेला समतेचा हा ध्वज अधिक उंच धरावा..

अन्य लेख

संबंधित लेख