Thursday, November 26, 2026

आपली घटना अधिक बळकट करण्याचा संकल्प

Share

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने आपली राज्यघटना स्वीकारली. या ऐतिहासिक दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेच्या प्रवासाचा, तिने सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनात आणलेल्या परिवर्तनाचा आणि विकसित भारताच्या उभारणीत तिचे असलेले स्थान यावर आपले विचार मांडले आहेत. घटनेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करतानाच, कर्तव्यभावनेतून देशाला पुढे नेण्याचे आवाहन करणारा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष लेख…

………………..

आपण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने आपली राज्यघटना स्वीकारली. आज आपण डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या प्रत्येक सदस्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो आहोत. आधुनिक राज्यघटना घडवताना भारताच्या समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक शहाणपणाचा मोठा आधार घेण्यात आला, यातच या घटनेचे मोठेपण दडलेले आहे.

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात अनेक श्रद्धा, भाषा, चालीरीती आणि विचारप्रवाह आहेत. अशा देशात राज्यघटना ही केवळ संसद आणि न्यायालयांच्या प्रांगणापुरती मर्यादित न राहता, तिचा आवाज सर्वदूर पोहोचणे महत्त्वाचे आहे. आपल्या लोकांच्या, विशेषतः तरुणांच्या सामूहिक जाणिवांशी घटनेची नाळ अधिक घट्ट जोडणे आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेली एकतेची भावना बळकट करणे, हाच आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. म्हणूनच दशकभरापूर्वी आमच्या सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस ‘घटना दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

घटनेप्रती कृतज्ञता आणि सामान्य माणसाचे सक्षमीकरण

माझ्यासह कोट्यवधी भारतीयांसाठी राज्यघटना हा आपल्या जीवनप्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. माझ्या बालपणाकडे, जडणघडणीतील साध्या परिस्थितीकडे आणि दैनंदिन जीवनातील संघर्षाकडे मागे वळून पाहताना, माझे मन आपल्या घटनेप्रती अपार कृतज्ञतेने भरून येते. जन्मतः कोणतेही विशेषाधिकार किंवा सवलती नसलेल्या सामान्य कुटुंबातील मुलाला एक दिवस जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची सेवा करण्याची जबाबदारी मिळते, यातूनच आपली राज्यघटना किती असामान्य आहे हेच स्पष्ट होते. एखाद्याच्या जन्माची परिस्थिती त्याच्या भविष्याच्या मर्यादा ठरवू शकत नाही, हे केवळ आपल्या घटनेमुळेच शक्य झाले आहे.

आपली राज्यघटना अधिक बळकट करून आम्ही आमच्या परीने या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रसिद्ध घटनातज्ज्ञ ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी आपल्या घटनेचे वर्णन “सर्वप्रथम आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे एक सामाजिक दस्तऐवज” असे केले होते. सामाजिक न्यायाचा ध्यास आपल्या घटनेच्या प्रत्येक धाग्यादोऱ्यात विणलेला आहे. त्यामुळे आपल्या घटनाकारांचे हे लाडके स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्य करण्यापेक्षा अधिक समाधानकारक दुसरे काय असू शकते?

जागतिक बँकेच्या अलीकडील अहवालातून सुमारे ५० कोटी भारतीय गरिबीतून बाहेर पडल्याचे समोर आले आहे. पिढ्यानपिढ्यांच्या वंचिततेच्या जोखडातून मुक्त होऊन आता कोट्यवधी पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहू शकतात.

सामाजिक आणि आर्थिक न्यायाची पूर्तता

‘पंतप्रधान आवास योजने’मुळे एखाद्या कुटुंबाला गळक्या छपराच्या घरातून पक्क्या घरात निवारा मिळतो, तेव्हा घटनेने दिलेल्या सन्मानाच्या वचनाला खरा अर्थ प्राप्त होतो. ‘उज्ज्वला योजना’ एका आईची धूर ओकणाऱ्या चुलीच्या त्रासातून मुक्तता करते, त्यातून समानता आणि कल्याणाची तत्त्वे पुढे जातात. ‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे गरीब कुटुंबाला कर्जाच्या भीतीविना दर्जेदार आरोग्यसेवा मिळते, यातूनच सामाजिक न्याय हे एक जिवंत वास्तव बनते. ‘मुद्रा’ आणि ‘पंतप्रधान स्वनिधी’ योजना लहान उद्योजक आणि पथविक्रेत्यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज उपलब्ध करून देतात, त्यातून आर्थिक न्यायाला खऱ्या अर्थाने मूर्त रूप येते. डिजिटल तंत्रज्ञान आणि ‘यूपीआय’सारख्या (UPI) व्यासपीठामुळे सर्व भेदभाव मिटून पूर्वी केवळ मूठभर विशेषाधिकारप्राप्त लोकांपुरत्या मर्यादित असलेल्या संधी प्रत्येक नागरिकाच्या आवाक्यात येतात; यातूनच आपण सर्वसमावेशकतेचा घटनात्मक आदर्श पुढे नेतो.

या घटनात्मक दृष्टिकोनाची अशी अनेक रूपे आज पाहायला मिळतात. आम्ही केलेल्या घटनादुरुस्त्यांकडेही याच दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते. १०१ व्या घटनादुरुस्तीने ‘जीएसटी’ (GST) लागू करून दीर्घकाळ प्रलंबित असलेली आर्थिक सुधारणा घडवून आणली. १०२ व्या घटनादुरुस्तीने ‘राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला’ घटनात्मक दर्जा देऊन समाजातील उपेक्षित घटकांचे अनेक दशकांचे स्वप्न पूर्ण केले. १०३ व्या घटनादुरुस्तीला व्यापक सामाजिक मान्यता मिळाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देऊन, विद्यमान आरक्षण चौकटीबाहेरील आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांच्या दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या आकांक्षा पूर्ण केल्या गेल्या.

१९५० मध्ये घटना लागू झाल्यानंतर प्रथमच आपल्या घटनेची अद्ययावत प्रत आठव्या अनुसूचीतील सर्व २२ भाषांमध्ये उपलब्ध झाली आहे. यामुळे आपली राज्यघटना सामान्य लोकांच्या अधिक जवळ आली आहे.

वसाहतवादी कायद्यांतून मुक्ती

१९५० मध्ये आपली राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतरही, आपल्या देशाचा कारभार १८६० च्या दशकातील वसाहतवादी दंडसंहितेनुसार सुरू होता. ‘भारतीय न्याय संहिते’च्या माध्यमातून आम्ही आपल्या फौजदारी न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये वसाहतवादी काळातील केवळ ‘दंडा’वर (शिक्षेवर) भर देण्याच्या मानसिकतेकडून नागरिक-केंद्रित ‘न्याया’च्या शोधाकडे आपण वाटचाल केली आहे.

गेल्या दशकात आम्ही ‘कर्तव्यावर’ विशेष भर दिला आहे. आपल्या संस्कृतीने नेहमीच प्रत्येक भूमिकेसोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांना महत्त्व दिले आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानापासून ते जलसंधारण आणि पर्यावरण रक्षणापर्यंत अनेक जनआंदोलनांमध्ये ही कर्तव्यभावना दिसून आली आहे.

इतिहासातील घटनाविरोधी पावले

तथापि, आणखी एक वास्तव मला तुमच्याशी शेअर करावेसे वाटते. आपल्या इतिहासात असेही प्रसंग आले आहेत, ज्यात घटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवलेल्यांनीच तिला कमकुवत करण्याचा मार्ग निवडला. दुर्दैवाने, याच लोकांना पाच दशके भारतावर राज्य करण्याची संधी मिळाली होती.

१९५१ मधील पहिल्या घटनादुरुस्तीला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या वेळी जनतेतून निवडून न आलेल्या एका सरकारने हंगामी संसदेतील आपल्या बहुमताचा वापर करून मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली होती. भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अवघ्या काही महिने आधी ही दुरुस्ती करण्यात आली होती; यावरूनच निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणे आणि सार्वजनिक विरोध दडपणे हाच त्यामागील हेतू होता हे स्पष्ट होते. आणीबाणीच्या काळात करण्यात आलेल्या ३८ व्या आणि ३९ व्या घटनादुरुस्त्यांनाही यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या दुरुस्त्यांमुळे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे अधिकार संकुचित केले गेले आणि घटनात्मक अधिकारांचा समतोल मूलभूतरीत्या बदलला गेला. सत्तालोलुप आणि घटनाविरोधी नेतृत्व काय करू शकते हे जाणून घेण्यासाठी तरुणांनी ३८ व्या आणि ३९ व्या घटनादुरुस्तीचा नक्कीच अभ्यास करावा, असे मी आवर्जून सांगेन.

निवडून आलेली राज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी कलम ३५६ चा वारंवार झालेला गैरवापर हे आणखी एक चिंताजनक प्रकरण आहे. एका पक्षाच्या नावावर तर कलम ३५६ जवळपास शंभर वेळा लागू करण्याचा संशयास्पद विक्रम आहे आणि एका माजी पंतप्रधानांनी तर या क्षेत्रात अर्धशतक ठोकले आहे.

आपल्या राज्यघटनेच्या शिल्पकारांना तिची अंमलबजावणी संपूर्ण भारतात अक्षरशः आणि तिच्या मूळ आत्म्यासह केली जाईल, अशी आशा होती. परंतु, ७० वर्षांहून अधिक काळ कलम ३७० आणि ३५-अ मुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण राज्यघटना लागू होऊ शकली नाही. परिणामी, तेथील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय समुदाय आणि महिलांच्या हक्कांची पायमल्ली झाली. अखेर २०१९ मध्ये ही ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्यात आली.

अनेक दशके भारताच्या विविध भागांत, विशेषतः आदिवासी क्षेत्रांमध्ये, नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर सर्वात गरीब लोकांना घटनेने दिलेले हक्क नाकारले. अलीकडच्या काळातील नक्षलवादाचे यशस्वी उच्चाटन विशेषतः दिलासादायक आहे; कारण त्यामुळे सर्वात गरीब लोक आता कोणत्याही भीतीशिवाय आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करू शकत आहेत. आता आपल्यासमोर केवळ ‘दिमागी नक्षलवादी’ शिल्लक आहेत, जे आपल्या काळातील वास्तवापासून दूर आहेत, परंतु आपल्या विकासाचा वेग रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

नारी शक्तीचा सन्मान

विरोधी पक्षातील सर्वांत मोठा पक्ष आता इतर मागासवर्गीयांचे (OBC) आरक्षण कमी करून मुस्लिमांना आरक्षण देऊ इच्छित आहे, हे अत्यंत धक्कादायक आहे. आपल्या घटनाकारांनी, विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याला पूर्णपणे विरोध केला होता.

ज्या उल्लेखनीय महिलांनी आपल्या घटनेला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली, त्यांच्या योगदानाची दखल घेतल्याशिवाय आपल्या घटनेचा प्रवास अपूर्णच राहील. परंतु, या वर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या प्रकाराने आपली मने शरमेने झुकली पाहिजेत. विधिमंडळांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व देणारे विधेयक एका विरोधी पक्षाने मंजूर होऊ दिले नाही; यातून त्यांनी घटनात्मक मूल्यांबद्दल असलेला आपला अनादर पुन्हा एकदा दाखवून दिला. मी भारताच्या ‘नारी शक्ती’ला आश्वस्त करतो की, त्यांना न्याय मिळवून देण्यापासून कोणतीही शक्ती आम्हाला रोखू शकणार नाही.

आपल्या घटनात्मक लोकशाहीत विरोधी पक्षासाठी एक स्पष्ट भूमिका निश्चित केलेली आहे. दुर्दैवाने, प्रमुख विरोधी पक्ष ‘विरोधी पक्ष’ (Opposition) होण्याऐवजी ‘अवरोध पक्ष’ (Obstructionist) बनल्याचे दिसते. लोकशाही प्रक्रियेत अडथळे आणणे हा घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा पर्याय असू शकत नाही, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.

आज भारत एका निर्णायक वळणावर उभा आहे. २०४७ पर्यंत ‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना दोन साधी पण अत्यंत शक्तिशाली तत्त्वे आपल्या सामूहिक प्रयत्नांना दिशा देऊ शकतात: आपल्या विचारांमध्ये ‘इंडिया फर्स्ट’ (राष्ट्र प्रथम) आणि आपल्या कृतींमध्ये ‘कर्तव्य’. ही मार्गदर्शक तत्त्वे आणि आपली राज्यघटना हेच आपल्या सामर्थ्याचे स्रोत मानून आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.

(लेखक भारताचे पंतप्रधान आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख